पारंपरिक पतंगोत्सवासाठी अवघे येवलेवासीय सज्ज झाले असून शहर आणि परिसरात पतंग, आसारीच्या दुकानांवर खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. वेगवेगळ्या आकार आणि प्रकारातील पतंगींबरोबर कटाकटीत सरस ठरेल असा धागा खरेदीचा विचार प्रत्येकाकडून होत आहे. पतंगोत्सवाच्या निमित्ताने बाजारात कोट्यवधींची रुपयांची उलाढाल होण्याच्या मार्गावर आहे.

हेही वाचा- नाशिक : यात्रेआधी काम पूर्ण करण्याचे संत निवृत्तीनाथ मंदिर देवस्थानासमोर आव्हान

पैठणीप्रमाणेच येवल्यातील पतंग महोत्सव देशात प्रसिद्ध आहे. येवला हे पतंगबाजाचे गाव म्हणून ओळखले जाते. शहरात पतंग, आसारीची दुकाने सजली आहेत. अन्य ठिकाणचा पतंगोत्सव आणि येवल्यातील पतंगोत्सव यात फरक आहे. भोगी, संक्रांत आणि कर असे सलग तीन दिवस येवल्यात दिवाळीसारखा हा उत्सव साजरा केला जातो. सहकुटुंब, मित्र परिवारासमवेत आसारीवर मनसोक्त पतंग उडविली जाते. मकर संक्रातीची सांगता दीपोत्सवाने होते. दिवाळीत होत नसेल इतकी आतषबाजी या दिवशी होते. प्रदीर्घ काळापासून चालत आलेली पतंगोत्सवाची परंपरा नवी पिढी उत्साहात पुढे नेत आहे. येवल्यात पतंग आणि मांजाची शंभरच्या आसपास दुकाने आहेत. पतंग निर्मितीचा मोठा व्यवसाय आहे. काही व्यावसायिकांच्या घरात दोन, तीन महिने वगळले तर वर्षभर सर्व सदस्य पतंग बनविण्यात मग्न असतात. त्यामध्ये ८० ते ८५ वर्षापर्यंतच्या वयोवृध्दांचाही समावेश असतो. संक्रातीपूर्वी बाहेरील व्यापारी पतंगी घाऊक दरात घेऊन जातात.

हेही वाचा- नाशिक पदवीधरची निवडणूक राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवाराविना; २९ उमेदवारांचे ४४ अर्ज दाखल

बाजारात मांजा आणि फिरक्यांचे विविध पर्याय असल्याने घरी तयार केल्या जाणाऱ्या मांज्याचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. पूर्वी लुकदी मांजा होता. घोटीव म्हणून तो ओळखला जायचा. हा मांजा तयार करायला बरीच मेहनत लागते. वेळही द्यावा लागतो. आता तयार मांजा खरेदीकडे कल आहे. नायलॉनवर बंदी असल्याने साध्या धाग्याची मागणी वाढली आहे. तीन पदरी, सहा पदरी, नऊ आणि बारा पदरी असे दोऱ्याचे प्रकार असून दर्जानुसार त्यांची १०० ते ५०० रुपये आणि त्याहून अधिक प्रति रिळनुसार किंमत आहे. वेगळेपण जपणाऱ्या पतंगी खरेदीकडे लक्ष दिले जात आहे. लंगर, बालाजी, अजिंठा, प्रकाश, फाईन, अश्फाक, जिव्हेश्वर, कोहिनूर, एवन् या पतंगांना अधिक पसंती मिळत आहे. बाजारात काही लक्ष वेधणाऱ्या पतंगी आहेत. अण्णा ढोल नावाचा पतंग चार फूट बाय चार फूट आणि आठ बाय आठ फूट असतो. २०२३ चा डबल अंडेदार, रॉकेट् सर्व रंगात आहे. बक्कस, हैदराबादी, औरंगाबाद, कानपुरी बरेली, येवलावाला, चमकीदार आदी पतंग विविध आकारात उपलब्ध आहेत. डुग्गी दोन रुपये, तीनचा पतंग तीन रुपये अर्धीचा पतंग पाच रुपये, कट पाउण पंधरा रुपये, पाऊणचा २५ रुपये, सव्वाचा पटकेदार ५० रुपये, अण्णा ढोल छोटा ४०० रुपये, अण्णा ढोल मोठा ७०० रुपये, तीनचा पतंग तीन रुपये अशा त्यांच्या किंमती आहेत.

हेही वाचा- तुम्ही काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा आदेश का धुडकावला? सत्यजीत तांबे म्हणाले, “अनेक दिवसांपासून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आसारी १०० ते ५०० रुपयांपर्यंत

आसारी ही येवल्याची खासीयत. पतंग उडविण्यासाठी देशभरात सर्वत्र फिरकी (मांजा गुंडाळण्यासाठी) वापरली जाते. त्यात पतंग उडविण्यासाठी दोघे जण लागतात. म्हणजे एक प्रत्यक्ष पतंग उडवतो, दुसरा फिरकी सांभाळतो. येवल्यातील आसारीवर एकच व्यक्ती सहजपणे पतंग उडवते. येवल्यात सारेजण अधिक्याने तीच वापरतात. पैठणीसाठी उपयोगात आणली जाणारी रेशीम धागा गुंडाळण्यासाठी उपयोगात येणारी आसारी यासाठी प्रामुख्याने वापरली जाते. संक्रांतीच्या काळात तिचा खास ‘फिरकी’ म्हणून वापर होतो. एरवीच्या आसारीत या निमित्ताने काही बदल केले जातात. चार पातांची असणारी आसारी काटाकुटीचा आनंद वाढविण्यासाठी सहा, आठ ते बारा पातीपर्यंत ही संख्या वाढविली जाते.बांबूच्या सहाय्याने ती तयार केली जाते. आकार आणि पातीवर तिची किंमत ठरते. चार-सहा पाती लहान, मध्यम आकाराची किमान १०० पासून ते १२ पाती मोठी आसारी ४०० ते ५०० रुपयांपर्यंत जाते. आसारींच्या किंमती दरवर्षी उंचावत असल्या तरी पतंगप्रेमींना त्याची तमा नाही.