लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : पक्षसंघटनेत काम करताना अनेकांना संधी द्याव्या लागतात, तर अनेकदा थांबावे लागते.कामाचे मूल्यमापन करून पक्ष नवीन संधी व जबाबदाऱ्या देत असतो. हरिभाऊ जावळे, ए. टी. नाना पाटील, स्मिता वाघ यांच्यासारखी अनेक उदाहरणे जिल्ह्यातील देता येतील. त्यांना पुढे पक्षाने दुसऱ्या जबाबदाऱ्या दिल्या. मात्र, एक संधी नाकारताच पक्ष सोडून जाणे म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची व आपल्याला मत देणाऱ्या जनतेची फसवणूक करणे आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांतच त्यांना त्यांची जागा कळेल, असा टोला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी उन्मेष पाटील यांना हाणला.

चाळीसगाव येथे झालेल्या महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघातील पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री महाजन यांनी भाजप सोडून गेलेले उन्मेष पाटील आणि करण पवार यांचा चांगलाच समाचार घेतला. जनतेचा विश्वास मोदींवर आहे, त्यांनी केलेल्या विकासकामांवर आहे, त्यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर आहे. जळगाव जिल्हा हा सुरुवातीपासून भाजप व मोदींवर प्रेम करणारा असल्याने सर्व स्तरांतील मतदार येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार ४०० पारचा नारा सार्थ ठरवतील, असे महाजन म्हणाले.

आणखी वाचा-सुबह का भुला, शामको घर वापस….खडसेंविषयी गुलाबराव पाटील यांचे विधान चर्चेत

आमदार मंगेश चव्हाण यांनीही उन्मेष पाटील यांच्यावर टीका केली. ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रस्थापित घराणेशाहीविरोधात संघर्ष उभा केला. खटले अंगावर घेतले, त्याच घराणेशाहीच्या दारी यांनी लोटांगण घातले, त्यामुळे अशा प्रवृत्तीला गाडण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेळाव्याला महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ, माजी मंत्री एम. के. अण्णा पाटील, माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर, जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार आदी उपस्थित होते.