नाशिक – साधारणत: दोन महिन्यांपूर्वी जळगावमध्ये महसूल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात तत्कालीन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कामाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी बरेच कौतुक केले होते. तेव्हा महाजन यांनी अशा माणसांची पक्षाला गरज असून त्यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. राजकारणात येण्याच्या चर्चेवर नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारताना आयुष प्रसाद यांनी भाष्य केले.
महायुतीतील सुप्त संघर्षाने नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आजतागायत सुटलेला नाही. कुंभमेळा मंत्रिपदाची जबाबदारी मिळताच मंत्री महाजन यांनी प्रशासकीय यंत्रणेवर पकड मजबूत करीत जणू पालकमंत्री असल्याच्या थाटात कारभार सुरू केल्याची मित्र पक्षांची भावना आहे.
कुंभमेळा नियोजनाची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रशासकीय वर्तुळात मोठे फेरबदल झाले. त्या अंतर्गत आपल्या खास मर्जीतील, जळगावमधील अधिकाऱ्याला नाशिक जिल्हाधिकारीपदी आणून मंत्री महाजन यांनी केवळ कुंभमेळाच नव्हे तर, जिल्हा नियोजन समितीवर आपली पकड मजबूत करण्याची पुरेपूर तयारी केल्याचे दिसत आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मधूर संबंधांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. काही दिवसांपूर्वी जळगाव येथील एका कार्यक्रमात मंत्री महाजन यांनी त्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निमंत्रण दिले होते. जिल्हाधिकारी राजकारणात येण्यास उत्सुक असून भाजपने केंद्रात अनेक अधिकाऱ्यांना मंत्री केले, तुमचाही विचार होईल, याकडे लक्ष वेधले होते.
बुधवारी दुपारी आयुष प्रसाद यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राजकारणात प्रवेश करण्याच्या चर्चेवर त्यांनी उत्तर दिले. कधीकधी अर्धवट चित्रफिती सर्वांसमोर आल्यानंतर सुसंगतता गायब होते. तुम्ही संपूर्ण भाषण ऐकले तर, विषय पूर्णत: स्पष्ट होतो.
एका कार्यक्रमात सत्कार, लोकांना विविध लाभ देण्यात आले. तेव्हा सर्वपक्षीय मंत्र्यांनी भाषणात इतक्या लोकांबरोबर काम केल्यामुळे तुम्ही प्रसिद्ध व्यक्तिमत्व झाले आहात. त्यामुळे तुम्ही राजकारणात जाण्यास इच्छुक आहात का, इच्छुक असाल तर आपल्याकडे येऊ शकतात, असे सकारात्मक भूमिकेतून म्हटले होते.
सर्व क्षेत्रात चांगले लोक हवेत. अशा भूमिकेतून ते विधान होते. आपला आयुष्यात प्रशासकीय सेवा सोडून इतर कोणत्याही मार्गावर जाण्याचा विचार नाही, हे खात्रीपूर्वक सांगू शकतो. आपण परिश्रमपूर्वक युपीएससी करून लोकसेवा करीत आहोत, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.