नाशिक : शनिवार आणि रविवार दोन दिवस मुसळधार पावसामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. गंगापूर धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे गोदावरीला पूर आला. तीन वर्षानंतर प्रथमच गोदापात्रातील दुतोंड्या मारुती पाण्याखाली गेला.

गोदावरीचे पाणी नदीकाठच्या परिसरात शिरले. जे मिळेल ते गोदावरीने वाहून नेले. त्यात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकुटीही वाहून गेली. गोदाकाठी नियमितपणे गोदाआरती होत असते. त्या आरतीशी संबंधित साहित्य त्या गोदाकुटीत होते. गोदाकुटी वाहून रामसेतू पुलाजवळ अडकली. सोमवार दुसरा दिवस उजाडला. आणि सुरु झाले गोदावरीतून गोदाकुटी बाहेर काढण्याचे प्रयत्न.

गोदावरीला पूर आल्यावर नदीकाठ परिसरात पुराचे पाणी शिरु लागल्यावर दुकानदारांनी आपआपले सामान आ‌वरण्यास सुरुवात केली होती. ज्यांनी धोका ओळखून आधीच सामानाची आवराआवर केली, त्यांना फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. परंतु, काही दुकानदार, हाॅटेल चालक शेवटच्या क्षणापर्यंत निर्धास्त होते. पुराचे पाणी आपल्यापर्यंत येणार नाही, असे त्यांना वाटत होते. परंतु, पाणी वाढू लागल्यावर त्यांना धावपळ करावी लागली. तरीही गोदावरीने काही सामान वाहून नेले.

काही दिवसांपासून गोदाकाठी नियमितपणे गोदाआरती केली जाते. रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने सुरु झालेल्या या उपक्रमाला भाविकांचा प्रतिसादही मिळत आहे. गोदावरीच्या पुरात रामतीर्थ गोदावरी सेवा समितीची गोदाकाठी असलेली गोदाकुटीही वाहून गेली. कपाटे, तांब्या-पितळेची भांडी, पूजावस्त्रे, अलंकार, दानपेट्या, अगदी पूजेचे पठारदेखील गोदावरीच्या पुरात वाहून गेले. त्यामुळे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे मोठे नुकसान झाले.

सोमवार पुरानंतरचा दुसरा दिवस उजाडला. आणि गोदा सेवकांनी रामसेतू पुलाजवळ अडकलेली रामकुटी काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पुराचे पाणी सोमवारपेक्षा कमी झाले असले तरी धोका होताच. सतत उसळणाऱ्या लाटांशी झुंज देत समितीचे सेवक शिवाजीराव बोंदार्डे, राजेंद्र फड, अक्षय शिरताटे आणि लक्ष्मण अहिरे यांनी प्रवाहात उतरून धाडस दाखविले. गोदामातेचे नामस्मरण करीत त्यांनी प्रयत्न सुरु केले.

याचवेळी वाळके क्रेन सर्व्हिसचे विलास वाळके आणि त्यांचे पथकही मदतीला आले. अतोनात कष्टाने आणि अत्यंत सावधगिरीने त्यांनी गोदाकुटी अलगद उचलून किनाऱ्यावर आणली. परंतु ,ती बाहेर आल्यावर गोदासेवक हेलावून गेले. गोदाकुटी पूर्णपणे विदीर्ण, फाटलेल्या पत्रावळीप्रमाणे झाली होती. आतले एकही सामान शिल्लक राहिलेले नव्हते. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष जयंतराव गायधनी, उपाध्यक्ष नृसिंह कृपादास, सचिव मुकुंद खोचे, विश्वस्त वैभव क्षेमकल्याणी, चैतन्य गायधनी आदी उपस्थित होते.

गोदा सेवकांनी एकत्रितपणे पुनश्च उभारणीचा निर्धार केला. “धैर्य आणि ऐक्याच्या जोरावर आपण पुन्हा गोदाकुटी उभी करू. या कार्यात सर्व सभासदांनी प्रार्थना, सेवा आणि योगदानाच्या माध्यमातून सहकार्य करावे,” असे आवाहन समितीने केले. नुकसान प्रचंड असले तरी महाआरती आणि सेवा अखंड सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.