जळगाव – शहरातील सुवर्ण बाजारात लग्नसराई आटोपल्यापासून सोने, चांदीचे दर बऱ्यापैकी कमी झाले होते. मात्र, आगामी काळातील सण-उत्सवांची चाहुल लागताच दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा तेजी आली आहे. शनिवारी सोन्याच्या दरात ६१८ तर चांदीच्या दरात २०६० रुपयांची वाढ नोंदविण्यात आली.
जळगावच्या सुवर्ण बाजारात ३० जून रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह ९८ हजार ८८० रुपये प्रति तोळा तर, चांदीचे दर जीएसटीसह एक लाख नऊ हजार १८० रुपये प्रति किलो होते. मधल्या काळात कमी-अधिक फरकाने दोन्ही धातुंच्या दरात चढ-उतार सुरू असताना, शनिवारी सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख एक हजार २४९ रुपये प्रति तोळा आणि चांदीचे दर एक लाख १६ हजार ३९० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. सोन्याच्या दरात १२ दिवसात २३६९ तसेच चांदीच्या दरात ७२१० रुपयांची वाढ नोंदविली गेली.
सोने आणि चांदीच्या किमती वाढण्यास बरेच घटक जबाबदार धरले जात असले, तरी जागतिक आर्थिक अनिश्चितताही तितकीच कारणीभूत ठरली आहे. अमेरिका आणि युरोपमधील महागाईचा दबाव तसेच मध्यवर्ती बँकांच्या व्याजदरांमधील संभाव्य बदलामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीला पुन्हा पसंती देऊ लागले आहेत. याशिवाय, गणेशोत्सवासह इतर सणांचा काळ जवळ येत असल्यामुळेही सोन्याचे दागिने आणि नाण्यांची मागणी वाढली आहे. याशिवाय, औद्योगिक मागणीत अचानक मोठी वाढ झाल्याने चांदीच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत.
सौर पॅनेल, इलेक्ट्रॉनिक्स आणि वैद्यकीय उपकरणांमध्ये चांदीचा वापर वाढतच आहे. त्यामुळेही चांदीची मागणी वाढली आहे. याशिवाय शेअर बाजारातील घसरणीचा कल देखील सोने आणि चांदी बाजाराला आधार देत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. सोने दरात वाढ होत असली तरी वेगवेगळ्या कारणांमुळे सोन्याचे दागिने घेणे जरुरीचे ठरत असल्याने मागणी यापुढेही कायम राहण्याची शक्यता आहे.
ज्यांच्या घरी लग्न ठरलेले असते, ते सोने आधीच घेऊन ठेवणे योग्य समजतात. शिवाय भविष्यात सोने दरात अधिक वाढ झाल्यास खर्च वाढू शकतो, त्यामुळे सध्याच्या भावात सोने घेऊन ठेवणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. ही संख्या यापुढेही टिकून राहण्याची सराफ व्यावसायिकांना आशा आहे.