लोकसत्ता वार्ताहर

धुळे: शहरातील मनमाड जीन आणि रामदेव बाबा नगरातील चोरीच्या दोन गुन्ह्यांची उकल करण्यात आझादनगर पोलिसांना यश आले असून या प्रकरणात दोघांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून दागिन्यांसह रोकड असा ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्वप्नील गवळी (रा.मनमाड जीन, धुळे) यांच्याकडे आठ ते नऊ सप्टेंबर दरम्यान घरफोडी झाली होती. १७ हजार रुपयांचे दागिने आणि ३० हजार रुपयांची रोकड, असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. शेख नजीर (रा.रामदेव बाबा नगर, धुळे) यांच्या घरातून १८ सप्टेंबर रोजी १९ हजार ६०० रुपयांचे दागिने, १० हजार रुपयांची रोकड, असा एकूण २९ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला होता. या दोन्ही गुन्ह्यांची आझादनगर पोलिसात नोंद झाली होती.

हेही वाचा… भुसावळमध्ये पाच टनांपेक्षा अधिक रसायनमिश्रित खवा जप्त; दोघांना अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना चोरांबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी पथकाला सूचना केल्या. त्यानुसार सहायक निरीक्षक संदीप पाटील, गौतम सपकाळ, मुक्तार मन्सुरी, प्रकाश माळी, योगेश शिरसाठ यांच्या पथकाने साहिल शहा (रा.रमजानबाबा नगर, धुळे), तौसिफ शहा (रा.रमजान बाबा नगर, धुळे) यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.