नाशिक : सरकार राज्य परिवहन महामंडळाच्या पाठीशी आहे. सरकारने १८०० नवीन बसेस दिल्या. त्याप्रमाणे कर्मचारीही वाढवायला हवेत, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

येथे रविवारी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ या संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कामगार मेळाव्यात या संघटनेचे प्रमुख तथा आमदार पडळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ, सदाभाऊ खोत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पडळकर यांनी राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी संख्या वाढविणे आणि महामंडळाची स्थिती सुधारणे गरजेचे असल्याचे सांगितले.

तत्कालीन मान्यताप्राप्त संघटनांच्या काळात १२४ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. आम्ही संघटनेत काम सुरू केल्यापासून केवळ दोन ते तीन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागण्या मान्य होतील. परंतु, कामगारांनी संघटित रहायला हवे. महामंडळाच्या बँकेची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्या ठिकाणी आपल्या लोकांनी काम करायला हवे. राज्य शासनाने महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारल्याचा दावाही त्यांनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी सदाभाऊ खोत यांनी, एसटी बस आणि गावगाडा यांचे जीवाभावाचे नाते असल्याचे सांगितले. महामंडळाला, त्यांच्या कर्मचाऱ्यांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटना काम करत आहे. आम्हाला कोणाच्या पैशांची गरज नाही, असे त्यांनी नमूद केले. महाजन यांनी महामंडळ हे ग्रामीण भागाचा आत्मा तर शहराची रक्तवाहिनी असून. मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. मंत्री भुजबळ यांनी हा मेळावा म्हणजे संघटनेचा आवाज असून तो सरकारपर्यंत पोहचत असल्याचे नमूद केले.