नाशिक : गेमिंग अॅपच्या माध्यमातून करचुकवेगिरी करणाऱ्या प्रकरणी जीएसटी विभागाच्या पुणे पथकाने नाशिकरोड येथील युवा उद्योजक श्रीकांत परे (२७, रा. सुराणा हॉस्पिटल चौक) यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापा टाकला. यावेळी गावठी बनावटीची बंदूक आणि सहा काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही राज्यातील अशा प्रकारची पहिली कारवाई असून परे याच्याविरुद्ध मोठ्या प्रमाणावर करचुकवेगिरी आणि बनावट कागदपत्र तयार करण्याचा आरोप आहे.
पुण्यातील जीएसटीचे अधिकारी अभय फाळके आणि रेणू रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शनिवारी सकाळी ही कारवाई केली. तब्बल सात तास तपासणी सुरु होती. परे याने कोपरगाव, नाशिक आणि पुणे येथे तीन कंपन्या स्थापन करून ऑनलाईन गेमिंग अॅप विक्रीच्या नावाखाली बनावट इन्व्हॉइस आणि कागदपत्रांद्वारे मोठ्या प्रमाणात कर बुडविला असल्याची माहिती समोर आली आहे.
तपासणीदरम्यान परे यांच्या घरातून दोन ट्रंक भरून नोटा, अंदाजे चार ते पाच कोटी रुपयांची रोकड, गावठी कट्टा, संगणक, हार्डडिस्क, आर्थिक कागदपत्रे आणि बनावट बिलांचे दस्तऐवज जप्त करण्यात आले. परे याने सुराणा चौकात दोन महिन्यांपूर्वी घर भाड्याने घेतले असून, ऑनलाईन वस्तू विक्रीच्या नावाखाली गेमिंग अॅपचा अड्डा सुरू केला होता. या कारवाईत एक अभियंता देखील पोलिसांच्या ताब्यात असून, चौकशी सुरू आहे.