नाशिक : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक प्रकल्पात तयार झालेले पहिले तेजस एमके-१ ए हे लढाऊ विमान १७ ऑक्टोबर रोजी आकाशात भरारी घेणार आहे. इंजिन उपलब्धतेतील विलंबामुळे तेजस एमके-१ एच्या वितरणात कालापव्यय झाला. हवाई दलातील लढाऊ विमानांचा असमतोल दूर करण्यासाठी एचएएलने उत्पादन वाढविण्यासाठी बंगळुरू नंतर नाशिक येथेही उत्पादन साखळी कार्यान्वित केली आहे.
एचएएलच्या सुविधेतून निर्मिलेल्या हलक्या तेजस एमके-१ ए या स्वदेशी लढाऊ विमानाचे पहिले उड्डाण शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी एचएएल प्रकल्पात कार्यान्वित करण्यात आलेल्या एचटीटी-४० या प्रशिक्षणार्थी विमानाच्या दुसऱ्या उत्पादन साखळीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्वदेशी तेजसच्या आधी या प्रकल्पात सुमारे ३०० सुखोई लढाऊ विमानांची बांधणी करण्यात आली होती.
अलीकडेच मिग- २१ च्या निवृत्तीनंतर हवाई दलाची ताकद सहा दशकांतील सर्वात कमी पातळीवर येण्याच्या मार्गावर आहे. या पार्श्वभूमीवर, एचएएल हलक्या तेजस लढाऊ विमानांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या अंतर्गत बंगळुरू येथे दोन तर नाशिकमध्ये एक उत्पादन साखळीचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी सुमारे १५० कोटींची गुंतवणूक करण्यात आली. नाशिक प्रकल्पात वार्षिक आठ विमानांची निर्मिती होईल. पुढील काही वर्षात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात जवळपास २०० तेजस लढाऊ विमानांच्या नवीनतम आवृत्ती समाविष्ट केल्या जाणार आहेत.
स्वदेशी बनावटीचे हलके तेजस हे ४.५ पिढीतील विमान मानले जाते. तेजस विमानाच्या संकल्पनेपासून ते त्याच्या चाचणीपर्यंत, भारतीय हवाई दलाचा चमू या निर्मिती प्रक्रियेत सहभागी होता. या लढाऊ विमानाची पहिली आवृत्ती, २०१६ साली, भारतीय हवाई दलाच्या तुकडीत समाविष्ट करण्यात आली. तेजसमध्ये वापरली जाणारी जवळपास ७५ टक्के सामग्री स्वदेशी आहे. तेजस एमके-१ए हे लढाऊ विमानाच्या विकासात भारताच्या वाढत्या स्वावलंबनाचे प्रतिक आहे. या विमानात त्याच्या पूर्ववतीच्या तुलनेत जवळपास ४० सुधारणा करण्यात आल्या. यामध्ये प्रगत एव्हियोनिक्स, आधुनिक रडार यंत्रणा , शस्त्रे, हवेतून हवेत इंधन भरणे, डिजिटल काचेची कॉकपिट आदींचा अंतर्भाव आहे. लढाऊ क्षमता वाढविण्यासाठीही अनेक बदल करण्यात आले. अति उंचावरील उड्डाणात वैमानिकाला प्राणवायू देणाऱ्या (ओबीओजीएस) व्यवस्थेची क्षमताही अधिक आहे. स्वदेशी व परदेशी शस्त्रांस्त्रांसाठी एकत्रित व्यवस्था हे त्याचे वेगळेपण आहे. ‘सेल्फ प्रोपेल्ड जँमर’ विमानाच्या इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमतांना बळकटी देते. एमके१ए प्रकारात विस्तरित शस्त्र सामग्री आहे, ज्यामध्ये दृश्यमान श्रेणीच्या पलीकडे हवेतून हवेत मारा करणाऱ्या अस्त्र क्षेपण