नाशिक – स्वदेशी तेजस – एमके – १ ए हे लढाऊ विमान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनाॅटिक्स लिमिटेड प्रकल्पात आयोजित कार्यक्रमात भारतीय वायूदलाकडे सुपूर्द केले जाणार आहे. तत्पूर्वी एचएएलच्या स्मार्ट टाउनशिपचे उदघाटन गुरुवारी सायंकाळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. या स्मार्ट टाउनशिपची अनेक वैशिष्ट्ये सांगितली जात आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे गुरुवारी सायंकाळी विशेष विमानाने ओझर विमानतळावर आगमन झाले. सैन्यदल आणि नाशिक जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील, मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, मेजर जनरल अभिमन्यू रॉय, नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, ब्रिगेडियर एन. आर. पांडे, ग्रुप कॅप्टन हरीश निर्वाल (स्टेशन कमांडर), पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

राजनाथ सिंह यांच्या हस्ते स्मार्ट टाउनशिपचे उदघाटन करण्यात आले. या स्मार्ट टाउनशिपची वैशिष्ट्ये यावेळी सांगण्यात आली. हरित तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा आणि समुदाय-केंद्रित सुविधांचा समावेश या स्मार्ट टाउनशिपमध्ये करण्यात आला आहे. यावेळी एचएएलचे डॉ. डी. के. सुनील, मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी यांच्यासह संचालक आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एचएएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. डी. के. सुनील यांनी, “एचएएलचा स्मार्ट टाउनशिप हा उपक्रम एचएएलच्या रहिवाशांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी उपयोगी पडेल, असे सांगितले. संसाधन कार्यक्षमता आणि पर्यावरणीय व्यवस्थापनात नवीन मानके स्थापित करणारी रचना या स्मार्ट टाउनशिपमध्ये करण्यात आली असून आधुनिक, शाश्वत आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत शहरी निवासस्थानाच्या दृष्टीने सर्वकाही यात असल्याचे नमूद करण्यात आले. या कार्यक्रमाशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रात्री नाशिकचे उद्योजक, एचएएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ इमारत विस्तारीकरणाची गरज उद्योजकांकडून मांडण्यात आली.