नाशिक – राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळलेली आहे. महिला अत्याचार वाढले आहेत, ड्रग्जचा काळाबाजार खुलेआम सुरु आहे. नाशिकला प्रभू रामाच्या वास्तव्याची ओळख आहे, काळाराम मंदिर आहे, अध्यात्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक ओळख असलेल्या नाशिकमध्ये ड्रग्जचे रॅकेट चालते हे गंभीर आहे. ड्रग्जच्या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी त्याचे गुजरात कनेक्शन तपासले पाहिजे, याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लक्ष वेधले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली येथे उत्तर महाराष्ट्र विभागातील जिल्ह्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी आगामी निवडणुकी संदर्भातील रणनीती आणि त्या संदर्भातील आढावा, याविषयी चर्चा करण्यात आली. या बैठकीला काँग्रेस कार्य समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, खासदार शोभा बच्छाव, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. ढासळती कायदा व सुव्यवस्था, ड्रग्जची खुलेआम होणारी विक्री आदी मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडले. नाशिकमध्ये नऊ महिन्यात ४४ खून झाले. ४५ वा लोकशाहीचा खून झाला. आपण कोणत्या राज्यात, देशात राहतो, सत्ताधाऱ्यांना महाराष्ट्राला तालिबान करायचा आहे का, असा प्रश्न त्यांनी केला. कायदा व सुव्यवस्था ढासळण्यास सत्ताधाऱ्यांनी सांभाळलेली पिलावळ जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मागील काही वर्षांपासून नाशिक हे अंमली पदार्थांमुळे गाजत आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी शहरालगतच्या शिंदे गाव एमआयडीसीत असलेल्या एमडी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करून कोट्यवधींच्या साठ्यासह एकाला ताब्यात घेतले होते. एमडी ड्रग्ज आणि अन्य अंमली पदार्थांचा साठा व विक्रीचे प्रकार पोलीस कारवाईतून समोर येत आहे. या घडामोडींवर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिकच्या अमली पदार्थांच्या गुजरात कनेक्शनकडे लक्ष वेधले. नाशिकसारख्या शहरात ड्रग्जचा खुलेआम काळाबाजार होतो हे गंभीर आहे. गुजरातमधील बंदरांतून अमली पदार्थ येथे येतात आणि महाराष्ट्रात इतरत्र जातात का. असा प्रश्न त्यांनी केला. यावेळी त्यांनी गुजरातमधील काही बंदरांची नावे कथन केली. ड्रग्जच्या काळ्याधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी त्याचे गुजरात कनेक्शन तपासण्याची गरज त्यांनी मांडली.