जळगाव : पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसानंतर आवक वाढल्याने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा जिल्ह्यातील हतनूर धरणाचे ३० दरवाजे उघडण्याची वेळ नुकतीच आली. ज्यामुळे तापी नदीला मोठा पूर देखील आला होता. मात्र, आता पावसाचा जोर कमी झाल्याने हतनूर धरणाचे बहुतेक दरवाजे बंद करण्यात आले आहेत. विसर्ग कमी झाल्याने नदी काठावरील गावांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारलेली असली तरी पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस होत असल्याने एकमेव हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसत होते. दरम्यानच्या काळात पाण्याची आवक थोडी कमी झाल्याने हतनूरचे बहुतांश दरवाजे बंद करून केवळ दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले. मात्र, गेल्या आठवडाभरात पाण्याची आवक पुन्हा वाढल्याने हतनूरचा उपयुक्त पाणी साठा झपाट्याने वाढताना दिसून आला. पाटबंधारे विभागाला त्यामुळे २४ दरवाजे पूर्णपणे आणि सहा दरवाजे एक मीटरने उघडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. यथावकाश पावसाचा जोर कमी झाल्यानंतर हतनूरचे बहुतांश दरवाजे आता बंद करण्यात आले आहेत.
सध्या फक्त चार दरवाजे पूर्णपणे उघडे ठेवण्यात आले आहेत. ज्या माध्यमातून शनिवारी सकाळी सांडव्यातून २२ हजार ८४९ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. याशिवाय, कालव्यातून १०० क्यूसेकचा विसर्ग केला जात होता. पाण्याची आवक कमी झाल्यास किंवा वाढल्यास धरणाच्या दरवाजांची स्थिती पुढील काळात बदलली जाऊ शकते, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, हतनूरचा विसर्ग घटल्याने शेळगाव बॅरेजच्या विसर्गावरही आता परिणाम झाला आहे. शनिवारी सकाळी या बॅरेजचे चार दरवाजे एक मीटरने आणि नऊ दरवाजे दीड मीटरने उघडे होते. ज्या माध्यमातून २५ हजार ७८० क्यूसेकने विसर्ग सुरू होता.
मध्यम प्रकल्पांच्या साठ्यात वाढ
जळगावमधील बोरी, भोकरबारी, हिवरा, बहुळा, अंजनी, तोंडापूर, अग्नावती, मन्याड, गूळ, मोर, सुकी, अभोरा आणि मंगरूळ या काही मध्यम प्रकल्पांमध्ये जुलैअखेर फार समाधानकारक पाणी साठा नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांच्या पाणी साठ्यात आता चांगली वाढ झाली आहे. काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे ओसंडून देखील वाहत आहेत. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात मध्यम प्रकल्पांमध्ये २३ ऑगस्टअखेर जेमतेम ३७ टक्के साठा होता. त्या तुलनेत यंदा ५०.२६ टक्के साठा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
पाणी टंचाईच्या झळा कमी
जिल्ह्यात पावसाला अपेक्षित जोर नसल्याने उन्हाळा संपल्यानंतरही पाणी टंचाई कायम होती. प्रशासनाला बऱ्याच गावांमध्ये टँकर सुरू ठेवावे लागले होते. मात्र, दमदार पावसानंतर टंचाईच्या झळा आता कमी झाल्या आहेत. तापी, गिरणा, वाघूर सोबतच अन्य बऱ्याच लहान नद्या खळाळत आहेत. परिणामी, विहिरींच्या पाणी पातळीतही बऱ्यापैकी वाढ होण्यास मदत झाली आहे. नद्यांच्या काठांवरील पाणी योजनांना मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने चाळीसगावसह भडगाव, पाचोरा, जळगाव, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, चोपडा, यावल, भुसावळ, जामनेर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.