जळगाव : हनी ट्रॅपसह इतरही काही गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढामुळे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात सध्या चांगलीच जुगलबंदी रंगली आहे. लोढाशी संबंध जोडून जुने व्हिडीओ तसेच छायाचित्रे बाहेर काढून एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही दोघांकडून केला जात आहे. तशात मंत्री महाजन यांनी आता प्रफुल्ल लोढा हा खडसे यांना गुलाब पुष्प देतानाचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करत आणखी खळबळ उडवून दिली आहे.
जामनेर तालुक्यातील ६२ वर्षीय प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईतील साकीनाका आणि अंधेरी तसेच पुण्यात बलात्कारासह खंडणी, अश्लील फोटोशूट व हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, प्रफुल्ल लोढा आणि भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे पूर्वी अत्यंत जवळचे संबंध होते. आताही हनी ट्रॅपमध्ये महाजन यांचा सहभाग असल्याचा आरोप राष्ट्र्वादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. लोढाजवळ असलेले पुरावे मंत्री महाजन यांना अडचणीत आणू शकतात, असेही खडसे यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास अधिक वेगवान आणि पारदर्शक व्हावा म्हणून त्यांनी एसआयटी स्थापन करण्याची मागणी देखील केली. दुसरीकडे, मंत्री गिरीश महाजन यांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना निखील खडसे यांच्या मृत्युचे जुने प्रकरण उकरून काढत एकनाथ खडसे यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.
एवढे सर्व होऊनही मंत्री महाजन यांच्याशी संबंधित काही पुरावे ताब्यात घेण्यासाठी लोढा याच्यावर गुन्हे दाखल केल्याचा आरोप आता नव्याने खडसे यांनी केला आहे. त्यामुळे महाजन हेही चवताळले असून, हनी ट्रॅप प्रकरणातील संशयित लोढा हा मोटारीत बसलेल्या एकनाथ खडसे यांना गुलाबाचे फूल देतानाचे जुने छायाचित्र त्यांनी समोर आणले आहे. त्यासोबतच एकनाथ खडसे… तुमच्या या गुलाबी गप्पा कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतेय. हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात. हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे.
२०१९ ते २०२२ च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली. अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली. पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच. आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय ? एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा…, अशी एकेरी भाषा गिरीश महाजन यांनी वापरली आहे.