लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक – जुने नाशिकमधील गोदावरी काठालगतच्या धोकादायक काझीगढी भागात शनिवारी दुपारी पावसामुळे माती ढासळून काही घरांची पडझड झाल्यामुळे या भागातील असुरक्षिततेचे सावट पुन्हा गडद झाले आहे. या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नसली तरी तीन घरांचे नुकसान झाले आहे.

इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर गोदा काठावरील संत गाडगे महाराज धर्मशाळेलगत असलेल्या काझीगढीच्या संरक्षणाविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली. काझीगढीच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रदीर्घ काळापासून रखडलेला आहे. या ठिकाणी सुमारे १०० कुटुंब वास्तव्यास आहेत. मातीच्या टेकडीवजा भागात धोकादायक स्थितीतील ही गढी आहे. तिचा गोदावरीच्या बाजूकडील भाग असुरक्षित झाला आहे. तरीदेखील रहिवासी जागा सोडण्यास तयार नसल्याने पावसाळ्यात आपत्तीचे संकट घोघावत असते. शनिवारी दुपारी गढीवरील तीन घरांच्या भिंती माती ढासळून खालच्या बाजूला गेल्या. खालील बाजूस गुरांचा गोठा आहे. मातीचा भराव गोठ्यावर न पडल्याने गुरांचे प्राण वाचल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दुर्घटना घडलेल्या भागात रांगेत १० ते १५ घरे आहेत. यातील गुलाब परदेशी, नंदु साळुंके आणि विकी परदेशी यांच्या घरांच्या काही भिंती मातीबरोबर कोसळल्या. यावेळी काही घरात लहान मुले होती. भिंत ढासळल्याचे लक्षात येताच आसपासच्या रहिवाशांनी लहान मुलांंना बाहेर काढून सुरक्षित अंतरावर नेले. कोसळलेल्या घरातील हाती लागेल ते साहित्य बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा >>>नंदुरबार जिल्ह्यात खैराचा अवैध साठा जप्त; गुप्तपणे करण्यात आली कारवाई

महापालिका पावसाळ्याआधी नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडते. पावसात यापूर्वी काझीगढीचा काही भाग ढासळण्याचे प्रकार घडलेले आहेत. या धोकादायक क्षेत्रात ७५ ते १०० कुटुंब वास्तव्य करतात. संभाव्य धोका लक्षात घेऊन मनपा प्रशासन गढीवरील रहिवाशांचे तात्पुरते सुरक्षितस्थळी स्थलांतर करते. स्थानिक कायमस्वरुपी पक्क्या घरांंची मागणी करतात. मुळात काझीगढी परिसर भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत आहे. तिच्या संरक्षणाची जबाबदारी या विभागाची असताना त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने दरवर्षी मातीचा ढिगारा ढासळणे वा घरांची पडझड होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संरक्षक भिंतीकडे दुर्लक्ष

मध्यवर्ती भागातील हे क्षेत्र असून आम्ही ५० वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्य करतो. काझीगढी येथे संरक्षक भिंत बांधण्याचे आश्वासन अनेक वर्षांपासून दिले जाते. मात्र त्याची पूर्तता आजवर केली गेली नाही, अशी तक्रार विकी परदेशी यांनी केली. दुर्घटना घडल्यानंतर महापालिकेची यंत्रणा बराच काळ घटनास्थळी आलेली नव्हती, अशीही स्थानिकांची तक्रार आहे.