मालेगाव : शहरातील भिकू चौक भागात २९ सप्टेंबर २००८ रोजी बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणच्या रस्त्याचे पंधरा वर्षांपूर्वीच शहीद हेमंत करकरे मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख असताना करकरे यांनी या बॉम्बस्फोट गुन्ह्याचा तपास केला होता. करकरे यांच्या नावाने मालेगावातील रस्ता नामकरणाची कहानी मोठी रंजक आहे.
रमजान ईदच्या २८ व्या रोजाच्या दिवशी खरेदीसाठी सायंकाळनंतर महिला-पुरुषांची मोठी गर्दी बाजारात उसळली होती. त्या दिवशी रात्री ९.३५ वाजेच्या सुमारास शहरातील भिकू चौक भागात बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. यात सहा जणांचा बळी गेला होता. तसेच शंभरावर लोक जखमी झाले होते. प्रारंभी स्थानिक पोलिसांकडे हा तपास होता. नंतर राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे हा तपास सुपूर्द करण्यात आला होता. एका दुचाकीवर ठेवलेल्या स्फोटकांच्या सहाय्याने हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याची माहिती तपासातून पुढे आली. दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून करकरे यांनी या प्रकरणाचा मुळाशी जाऊन छडा लावण्याचा प्रयत्न केला होता. ही दुचाकी साध्वी प्रज्ञा यांच्या नावे नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर साध्वी, कर्नल पुरोहित व अन्य हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित एकूण सात जणांचा या कृत्यात समावेश असल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती. या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन जवळपास १७ वर्षांनंतर विशेष न्यायालयाने या खटल्यातील सर्व संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे.
बॉम्बस्फोटाची ही घटना घडल्यावर दोन महिने झाले नाही तोच २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात हेमंत करकरे व अनिल कामटे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद झाले. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास कालांतराने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे गेला. तथापि, करकरे यांनी या प्रकरणी केलेल्या तपासाविषयी विशेषत: शहरातील मुस्लिम समुदायात त्यांच्याबद्दल एक प्रकारचा आदर निर्माण झाला होता. त्यामुळे ते शहीद झाल्यावर मालेगावात मोठ्या प्रमाणावर हळहळ व्यक्त केली गेली. तसेच त्यांच्याप्रती आदरभाव आणि त्यांच्या स्मृती जिवंत राहाव्यात म्हणून भिकू चौक ते नेहरू चौक या रस्त्याचे शहीद हेमंत करकरे मार्ग असे नामकरण करण्याची कल्पना पुढे आली.
१७ डिसेंबर २००८ रोजी पार पडलेल्या महापालिकेच्या मासिक सभेत नामकरणाचा हा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला होता. तेव्हा महापालिकेत तिसरा महाज या संघटनेची सत्ता होती. या पक्षाचे नजमुद्दीन खजुरवाले हे महापौर होते. या ठरावानुसार काही दिवसांतच या नामफलकाचे अनावरण करण्यात आले होते. या कार्यक्रमास मौलाना मुफ्ती इस्माईल, तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे आदी उपस्थित होते. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहीदाचे एखाद्या रस्त्याला नाव देणारे मालेगाव हे राज्यातील एकमेव उदाहरण असावे.