जळगाव : भाऊबीजेच्या दिवशी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगावकडे जात असताना पाळधी गावाच्या बायपासवर रस्त्याच्या कडेला एक तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्यांनी तत्काळ आपल्या ताफ्याला थांबवत त्या तरुणाच्या मदतीसाठी धाव घेतली. कार्यकर्त्यांना मदत करण्याचे निर्देश देत डॉक्टरांशी संपर्क साधून आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवून दिली.
मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांसोबतच मानवी संवेदना जपणारा हा त्यांचा हृद्य क्षण होता. यानंतर गुलाबराव पाटील चोपडा येथे आपल्या दोन्ही बहिणी निर्जलाताई देशमुख आणि सुशीलाताई गुजर यांच्या घरी गेले आणि भाऊबीज साजरी केली. या प्रसंगी कुटुंबातील सदस्य आणि मान्यवरांची उपस्थिती होती. बहिणींनी पारंपरिक पद्धतीने ओवाळून भावाला दीर्घायुष्याचे आशीर्वाद दिले, तर पाटील यांनीही त्यांना स्नेहभेट देऊन आपुलकीचा प्रत्यय दिला.
आपल्या खास शैलीत बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, “राखी असो वा भाऊबीज हा फक्त सण नसून भावनांचा उत्सव आहे. बहिणीच्या ओवाळणीसमोर सर्व सत्ता, पद आणि वैभव लहान वाटते. आईवडिलांचे आशीर्वाद आणि बहिणींच्या मनातील प्रार्थना हेच माझे खरे बळ आहे. दरवर्षी चोपडा आणि पिंप्री येथे आपल्या तिन्ही बहिणींना आलटून-पालटून भेटून भाऊबीज साजरी करण्याची परंपरा ते कायम ठेवतात.
राजकारण, मंत्रीपद आणि सार्वजनिक जबाबदाऱ्यांच्या व्यापात असूनही कौटुंबिक नाती जपण्याचा किंवा एखाद्याचा जीव वाचविण्याचा प्रयत्न मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी केवळ राजकीय नेते म्हणून नव्हे, तर मानवी संबंधांना प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व म्हणूनही सर्वांच्या मनात स्थान मिळवले.