लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: अवैधपणे दोन वाहनांमधून होत असलेली गोवंशांची वाहतूक वणी पोलीस ठाण्याच्या पथकाने रोखली. दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा परिसरात पोलिसांनी सापळा रचून दोन वाहने काही वेळाच्या अंतराने अडवून गोवंश जातीच्या १२ जनावरांची सुटका केली. एकूण नऊ लाख, ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

वणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीलेश बोडखे यांना दोन वाहनांमधून अवैधपणे गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांचे उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे, कर्मचारी कुणाल मराठे, अण्णा जाधव, कमलेश देशमुख यांच्यासह मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास लखमापूर फाट्याजवळ सापळा लावला. कोशिंबेमार्गे नाशिककडे जाणारी दोन मालवाहू वाहने त्यांनी १५ ते २० मिनिटांच्या अंतराने अडवली. या वाहनांमध्ये पाय, तोंड बांधून निर्दयीपणे कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी चालक कादिर अकिल नाईकवडे (रा. जामुनमाथा), जुबेर हुसेन शेख (रा.उंबरठाण) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन वाहने आणि १२ गोवंश जातीची जनावरे ताब्यात घेतली. जनावरांची सुटका करून वणी येथील गोशाळेत सोडण्यात आले.

आणखी वाचा- धुळे: चमकणारी मेणबत्ती बनविण्याच्या कारखान्याला आग, चार महिलांचा होरपळून मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरगाणा परिसरातून अनेकदा कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडण्यात येतात. पूर्वी वणीमार्गेही अनेक कारवाया झाल्या आहेत. आता करंजखेड, कोशिंबे या मार्गावरुनही अवैधपणे जनावरांची वाहतूक होऊ लागल्याचे या घटनेवरुन उघड झाले आहे.