धुळे: आंतरराष्ट्रीय व्हॉटसअप व्हर्चुअल नंबरवरून बनावट भ्रमणध्वनी करुन ‘लष्कर ए तय्यबा’ या अतिरेकी संघटनेतून बोलत असल्याची बतावणी करणाऱ्या दोघांना धुळे येथील सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. फसवणुकीच्या उद्देशाने दोघांनी हे कृत्य खोडसाळपणे केल्याचे प्राथमिक चौकशीत निदर्शनास आले आहे.

यासंदर्भात इमरान शेख (२८, रा.प्लॉट नं. ५०, मुल्ला कॉलनी, चाळीसगावरोड, धुळे) या जय टायगर सिक्युरिटी एजन्सीच्या व्यावसायिकाने तक्रार दिली. शेख यांना २१ एप्रिल रोजी रात्री सव्वा आठ वाजता आंतरराष्ट्रीय कोड असलेल्या नंबरवरून व्हॉटसअप भ्रमणध्वनी आला. लष्कर ए तय्यबा या अतिरेकी संघटनेतून बोलत असल्याचे सांगून शेख यांना फसविण्याचा प्रयत्न झाला. या भ्रमणध्वनीमुळे हादरलेल्या इमरान यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अंतरराष्ट्रीय व्हर्चुअल नंबरची माहिती काढण्याबाबत सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सुचना केल्या. शेख यांच्या परिचयातील ऋषिकेश भांडारकर (रा. शनी मंदिराजवळ, देवपूर, धुळे) यानेच आंतरराष्ट्रीय व्हर्चुअल नंबरच्या माध्यमातून इमरान यांना व्हॉटअसप भ्रमणध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. संभाषण खरे वाटावे यासाठी ऋषिकेशचा मित्र खालीद अन्सारी याने हिंदी भाषेत संभाषण केले.

हेही वाचा : धोकादायक इमारतींसह पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण – आपत्ती प्राधिकरण यंत्रणेची सूचना

दोन्ही संशयित हे धुळे शहरातीलच राहिवासी असून त्यांनी स्वतःची ओळख लपवून परिचयातील इमरान यास खोडसाळपणे व्हर्चुअल नंबरच्या सहाय्याने दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांनी तांत्रिक विश्लेषण आणि सखोल चौकशी करून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.