जळगाव – पावसाचा मोठा खंड पडल्याने आधीच उडीद पिकापासून फार उत्पादन मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे. त्यात ऐन पीक काढणीवर आले असताना पाऊस थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे परिपक्व अवस्थेतील उडीद पीक हातचे वाया चालल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग, तूर आणि चवळी या कडधान्य वर्गीय पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ४६ हजार ४१० हेक्टर आहे. प्रत्यक्षात यंदाच्या खरिपात कडधान्य पिकांची पेरणी सात टक्क्यांनी घटून ४३ हजार १२० हेक्टरपर्यंत घसरली आहे. एकमेव तुरीचे क्षेत्र ३६ टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात उडीद पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १६ हजार १८१ हेक्टर इतके आहे. प्रत्यक्षात, यंदा १४ टक्क्यांनी पेरणी घटल्याने उडदाचे क्षेत्र १३ हजार ८९० हेक्टपर्यंत घसरले आहे. पावसाचे उशिरा आगमन झाल्याने यंदा शेतकऱ्यांना उडीद पिकाची वेळेवर पेरणी करता आली नाही. तशात ऐन वाढीच्या आणि फुलोरा अवस्थेत पावसाने महिनभराची दडी मारल्याने उडीद पिकाच्या वाढीवर आणि शेंगांच्या प्रमाणावर बराच परिणाम झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघणार नाही, अशी परिस्थिती आहे.

दरम्यान, ऐन तोंडाशी घास आल्यानंतर पावसाची अधुनमधून हजेरी लागत असल्याने परिपक्व अवस्थेतील उडीद पीक काढण्याची थोडीही संधी मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. काही ठिकाणी शेंगांमधील दाण्यांना कोंब फुटू लागल्याचे निदर्शनास आले आहे. आता पावसाने उघडीप दिली तरी पीक खराब झाल्याने उडदाला बाजारात अपेक्षित भाव मिळण्याची शक्यता मावळली आहे. चांगल्या उत्पादनाच्या आशेने उडीद पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना त्यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर आधी पुरेशा पावसाअभावी आणि आता अतिपावसामुळे नुकसान सोसणाऱ्या उडीद उत्पादक शेतकऱ्यांकडून सरसकट पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पिके कुजली असून, शेतकरी रडकुंडीला आला आहे. उडीद पिकात पाणी साचून राहिल्यास मूळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. १५ दिवसांपूर्वी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली होती. नदी-नाल्यांना पूर आल्याने सखल भागातील पिकांत पाणी साचले होते. त्याचाही फटका उडीद पिकाला बसला आहे. चांगले पीक येईल आणि डोक्यावरील कर्जाचा भार कमी होईल, या आशेवर संबंधित शेतकरी होते. मात्र, पाऊस आला आणि क्षणात होत्याचे नव्हते करून गेला.

आधी पुरेशा पावसाअभावी आणि आता काढणीच्या वेळी अतिपावसाने उडीद पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. – भालचंद्र ढाके (शेतकरी- ममुराबाद, जि. जळगाव)