जळगाव : जिल्ह्यातील चोपडा तालुका मध्य प्रदेशातून चोरट्या मार्गाने राज्यात येणाऱ्या अवैध शस्त्रांसह अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमुख केंद्र बनला आहे. संबंधित गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यात आजपर्यंत यश आले नसल्याने चोपडा ग्रामीण पोलिसांनी आता गावठी बंदुका आणि गांजाची विक्री करणारे हेच आमचे खबरी असल्याचे फलक तस्करीच्या मार्गांवर लावले आहेत. त्याद्वारे खरेदीदारांना सावध करून विक्रेत्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे.

सातपुड्याच्या घनदाट जंगलात अनेर नदीच्या काठावरील मध्य प्रदेशातील उमर्टीसारख्या काही गावांमध्ये गावठी बंदुकांची राजरोजसपणे निर्मिती केली जाते. त्याठिकाणी तयार होणाऱ्या गावठी बंदुका अवघ्या २० हजार रुपयांत सहजपणे मिळत असल्याने, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक खरेदीदार तिथे कायम घुटमळताना दिसतात. गावठी बंदुकांचे मध्य प्रदेशातील कारखाने थांबविणे शक्य नसले, तरी मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणारी तस्करी थांबविण्यासाठी जळगाव पोलिसांकडून नाकाबंदीसह इतरही अनेक उपाययोजना बाराही महिने सुरुच असतात. त्यामुळे अधूनमधून गावठी बंदुकांची तस्करी करणारे पकडलेही जातात.

मात्र, तस्करी करणारे तेव्हाच पकडले जातात, जेव्हा बंदुका तयार करणारेच पोलिसांना त्यासंदर्भात माहिती देतात. अर्थात, खरेदी करण्यासाठी १० जण आल्यावर त्यापैकी दोनच पकडले जातील, याची काळजी गावठी बंदुका विकणारे घेतात. ज्यामुळे, पोलिसांना कारवाईचे समाधान आणि गावठी बंदुका विकणाऱ्यांना तात्पुरते अभय मिळते. या दृष्टचक्रामुळे मध्य प्रदेशातील अवैध शस्त्र निर्मितीसह विक्रीला आणि महाराष्ट्रातून होत असलेल्या तस्करीला आजतागायत पूर्णपणे पायबंद घालता आलेला नाही. अशीची परिस्थिती गांजा विक्रीची.

या पार्श्वभूमीवर, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचा नुकताच पदभार घेतलेले निरीक्षक अनिल भवारी यांनी मध्य प्रदेशातील गावठी बंदुकांसह अमली पदार्थांची सर्वाधिक तस्करी होणाऱ्या मार्गांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शन घेऊन त्यांनी गलंगी, उमर्टी, सत्रासेन, वैजापूर या गावांच्या परिसरात ठिकठिकाणी सावधान…गावठी बंदुका, गांजा खरेदी करत आहात. पोलिसांची नजर तुमच्यावर आहे. कारण, तुम्हाला बंदुका आणि गांजा विकणारेच पोलिसांचे खबरी आहेत, अशा आशयाचे फलक झळकविले आहेत. विशेष म्हणजे, नागरिकांनी संशयितांसह त्यांनी वापरलेल्या वाहनांची माहिती पोलिसांना दिल्यास त्यांना योग्य ते बक्षीस देण्याचेही जाहीर करण्यात आले आहे. या फलकांची सध्या चर्चा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावठी बंदुकांसह गांजाची विक्री आणि तस्करी करणार्‍यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांचे सतत प्रयत्न सुरू असतात. त्यापुढे जाऊन आता खरेदीदारांना सावध करून अवैध शस्त्रे आणि अमली पदार्थांच्या विक्रेत्यांना चाप लावण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. – अनिल भवारी (पोलीस निरीक्षक, चोपडा ग्रामीण, जळगाव)