नाशिक : दिंडोरी तालुक्यातील जऊळके शिवारातून ६० लाखांची यंत्रसामग्री लंपास होऊनही या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या दिंडोरी पोलिसांनी महासंचालकांच्या सूचनेनंतर पाच वर्षांनंतर गुन्हा दाखल केला. परंतु, संशयितांविरुध्द कारवाईला कालापव्यय केला जात असल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. यंत्रसामग्रीची चोरी झाल्यामुळे तक्रारदाराचे उद्योग व्यवसायाचे स्वप्न भंगले. उदरनिर्वाहाचे साधन कायदेशीर मार्गाने परत द्यावे आणि पाच वर्षात पाठपुरावा करूनही गुन्हा दाखल करण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली. याची विचारणा तक्रारदाराने केली आहे.

यासंदर्भात तुषार कासार यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली होती. महासंचालकांच्या सूचनेनुसार चौकशीनंतर दिंडोरी पोलीस ठाण्यात १९ मार्च २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. याची माहिती दिंडोरी पोलीस ठाण्याकडून कासार यांना देण्यात आली. या प्रकरणी जितु ठक्कर, हिराभाई ठक्कर, विजय ठक्कर, मनोज चंदन, रिटा चंदन आणि माधवी चंदन (सर्व पंचवटी भाजीपाला बाजार, नाशिक) या सहा संशयिताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराने पाच वर्षे दिंडोरी पोलीस ठाणे, नाशिक पोलीस अधीक्षक आणि अखेरीस पोलीस महासंचालक अशा सर्व पातळ्यांवर पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

कासार यांना भांडी बनविण्याचा कारखाना सुरू करायचा होता. त्यासाठी त्यांनी २०१५ मध्ये हिराभाई आणि जितू ठक्कर यांच्याशी बोलणी करून जऊळके शिवारातील गणेश वेअर हाऊसमधील ११ क्रमांकाचा गाळा भाडेतत्वावर घेतला होता. कारखान्यासाठी घेतलेली विविध प्रकारची सुमारे ६० लाखांची यंत्रसामग्री गाळ्यात ठेवली होती. याठिकाणी वीज आणि पाण्याची व्यवस्था नसल्याने तक्रारदाराला कारखाना सुरू करता आला नाही. त्यामुळे २०१६ मध्ये तक्रारदाराने भाडे देणे थांबवले. ठक्कर यांनी आश्वासन दिल्यावर २०१८ पर्यंत भाडे दिले. वीज आणि पाण्याची पूर्तता न करता ठक्कर यांनी दमदाटी, शिवीगाळ केली. याबद्दल आपण पोलिसात तक्रार केली होती, असे कासार यांनी म्हटले आहे. २३ फेबुवारी २०१९ रोजी गाळ्याचे शटर उघडे दिसले. तिथे वेगळ्याच कंपनीचे साहित्य ठेवलेले होते. आपली यंत्रसामग्री संशयितांनी मालमोटारीत टाकून नेल्याचे आसपासच्या लोकांकडून समजले. या संदर्भात दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरही कारवाई झाली नसल्याचे कासार यांचे म्हणणे आहे.

कासार यांनी नंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज केला. त्याची प्रत दिंडोरी पोलिसांना दिल्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. वारंवार चकरा मारूनही त्यांना यंत्रसामग्री परत मिळाली नाही. बंद गाळ्यात सुरक्षित ठेवलेली यंत्रसामग्री संशयिताने कुलूप तोडून चोरून नेल्याचे कासार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा : नाशिक तापले… पारा ४०.४ अंशावर, काही भागात पावसाचा शिडकावा

या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटूनही संशयितांवर कारवाईला टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार कासार यांनी पोलीस महासंचालकांकडे केली. पाच वर्षे तक्रार अर्जावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या संदर्भात दिंडोरी पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी गुन्हा दाखल झाल्याचे नमूद केले. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असून तपास प्रगतीपथावर असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.