नाशिक: रस्त्यांवरील खड्डे, धरण तुडुंब असूनही शहरात निर्माण झालेली टंचाई आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव या मुद्यावरून सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना धारेवर धरले. हे प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास आयुक्तांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही, असा इशारा संबंधितांनी दिला. या घडामोडीनंतर आयुक्तांनी तातडीने बैठक घेत हे विषय आठ दिवसांत मार्गी लावण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

प्रशासकीय राजवटीतील महापालिकेच्या कारभाराविषयी राजकीय पातळीवर पडसाद उमटत आहेत. सत्ताधारी पक्षही यात मागे नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी आयुक्तांची भेट घेत प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त केला. शहरातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारांशी संगनमत केल्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम झाले. पावसाळ्याआधी हे काम योग्य प्रकारे झाले नाही. रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावे आणि निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा : जळगाव जिल्ह्यात वीज कोसळून पाच जण जखमी, कांग नदीच्या पुरात वाहून गेल्याने तरुणीचा मृत्यू

गंगापूर आणि दारणा धरणात पुरेसा जलसाठा असूनही शहरातील अनेक भागात टंचाई भेडसावत आहे. जुने नाशिकमध्ये दुषित पाणी पुरवठा होत आहे. गंगापूर रोड परिसरात सर्वत्र टंचाई असल्याकडे आमदारांनी लक्ष वेधले. डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना मनपा प्रशासन सुस्त आहे. आवश्यक औषध फवारणी होत नाही. रुग्णांची नोंद आरोग्य विभाग घेत नसल्याचा आरोप आमदारांनी केला. या तिन्ही विषयांवर महापालिकेने तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा मनपा आयुक्तांना खुर्चीवर बसू दिले जाणार नाही, उपोषण केले जाईल असा इशारा फरांदे आणि ढिकले यांनी दिला.

हेही वाचा : नाशिक: दोन महिन्यांपासून फरार संशयित ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ दिवसांत प्रश्न मार्गी लावणार

भाजपच्या आमदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मनपा आयुक्तांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. रस्त्यांवरील खुड्डे बुजविणे, पाणी पुरवठ्यातील दोष दूर करून तो सुरळीत करणे आणि डेंग्यू नियंत्रणासाठी प्रभावीपणे काम करण्याची सूचना केली. पुढील आठ दिवसांत हे प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.