नाशिक : नाताळच्या सुट्टीनिमित्त शहरासह जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनात लक्षणीय वाढ झाली असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी गर्दीमुळे भाविकांना तब्बल सात ते आठ तास प्रतिक्षा करावी लागत आहे. सप्तश्रृंग गडावर दिवसाला ७० ते ८० हजार भाविक दाखल होत आहेत. सोमवारी फर्निक्युलर ट्रॉलीची व्यवस्था अकस्मात बंद पडल्याने भाविकांना ६०० पायऱ्या चढ-उतार करताना दमछाक झाली. शहरातील काळाराम मंदिरात भाविकांमध्ये कित्येक पट वाढ झाली. काळाराम मंदिरात रांगेची व्यवस्था नसल्याने भाविकांचे १५ ते २० मिनिटांत दर्शन होत आहे.

नाताळच्या सुट्टीत कुंभनगरीच्या अर्थकारणाला धार्मिक पर्यटनाने गती दिली आहे. काही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांस्तव भाविकांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळी मुंबईसह गुजरातमधून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्र्यंबकमध्ये प्रचंड गर्दी उसळल्याने दर्शनाचे नियोजन कोलमडले. नियमित दर्शन रांगेतून सात ते आठ तासानंतर त्र्यंबक राजाचे दर्शन होते. रुपये २०० भरून देणगी प्रवेशाची व्यवस्था आहे. संबंधितांची वेगळी रांग असते. सध्या ही व्यवस्था कधी सुरू तर, कधी मध्येच बंद केली जाते. यामुळे ज्येष्ठांसह अनेकांची अडचण झाली असून काहींना दर्शन न घेता माघारी फिरावे लागत आहे. त्र्यंबकेश्वर गावात वाहनांची संख्या वाढल्याने गल्लीबोळात वाहन उभे करण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जात आहे. सलग सुट्यांमुळे संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर व्यवस्थापनाने कुठलेही नियोजन केले नसल्याची तक्रार पुरोहित संघाच्या सदस्यांनी केली आहे.

हेही वाचा : करोनाच्या नवीन व्हेरियंटचा भुसावळ तालुक्यात रुग्ण; प्रकृती धोक्याबाहेर

सप्तश्रृंग गडावर भगवतीच्या दर्शनासाठी रोज ७० ते ८० हजार भाविक दाखल होत असून मंगळवारी पौर्णिमेच्या दिवशी त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता श्री सप्तश्रृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त ॲड. ललित निकम यांनी व्यक्त केली. रविवारपासून मंदिर दर्शनासाठी पहाटे साडेपाच ते रात्री ११ या वेळेत खुले करण्यात आले आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजे ३१ तारखेला मंदिर २४ तास खुले राहणार असल्याचे ॲड. निकम यांनी नमूद केले. मुख्य मंदिरात पोहोचल्यानंतर अर्धा ते पाऊस तासात दर्शन होते.

शहरातील काळाराम मंदिरातही भाविकांच्या संख्येत आठ ते दहा पटीने वाढ झाल्याचे मंदिराचे विश्वस्त महंत सुधीर पुजारी यांनी सांगितले. एरवी दर्शनासाठी मंदिरात पाच ते सात हजार भाविक येतात. सलग सुट्या आल्यामुळे अनपेक्षित गर्दी झाली. परंतु, मंदिरात दर्शनासाठी रांगेची व्यवस्था केलेली नाही. तशी व्यवस्था केल्यास गोंधळ होतो. त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्यवस्थेचा दाखला देत भाविकांना बराच काळ तिष्ठत रहावे लागते. रांग नसल्यामुळे काळाराम मंदिरात भाविक दर्शन घेऊन लवकर बाहेर पडतो, असे पुजारी यांनी नमूद केले.

हेही वाचा : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ७ हजार २०५ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फर्निक्युलर ट्रॉली बंद पडल्याने गडावर गैरसोय

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी गडावर ३०० पायऱ्या चढाव्या लागतात. भाविकांना जलदपणे मंदिरात नेण्यासाठी फर्निक्युलर ट्रॉलीची खास व्यवस्था आहे. ज्येष्ठांसह बहुतांश भाविक या व्यवस्थेतून मंदिरात पोहोचतात. तांत्रिक समस्येमुळे सोमवारी ही व्यवस्था बंद राहिल्याने भाविकांची अडचण झाली. शेकडो भाविकांना पायरी मार्गाने मंदिर गाठावे लागले. ज्येष्ठांसह अनेकांंना इतक्या पायऱ्यांची चढ-उतार करणे शक्य झाले नाही. मंगळवारी फर्निक्युलर ट्रॉलीची व्यवस्था पूर्ववत होण्याची शक्यता विश्वस्त ॲड. ललित निकम यांनी व्यक्त केली.