मालेगाव : नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेचा घोटाळा केल्याच्या आरोपावरुन साडे तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांनी जामिनासाठी आता जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. बुधवारी या अर्जावर सुनावणी होणार आहे. हिरे कुटुंबियांशी संबंधित येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेने १० वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून सात कोटी ४६ लाखाचे कर्ज घेतले होते. या कर्ज प्रकरणात बँकेची फसवणूक झाल्याप्रकरणी माजीमंत्री प्रशांत हिरे, स्मिता हिरे, अपूर्व हिरे, अद्वय हिरे यांसह २८ जणांविरुद्ध येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी अद्वय हिरे वगळता सर्व संशयितांना येथील जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला, मात्र अद्वय यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला होता. त्यामुळे अद्वय यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, उच्च न्यायालयानेही त्यांचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर १५ नोव्हेंबरला अद्वय यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर जामिनासाठी त्यांनी केलेला अर्जही येथील न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यामुळे हिरे यांच्या वतीने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती.

हेही वाचा…मंत्री दादा भुसे यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपड, भाजपमध्ये धाकधूक 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जामिनासाठीचा अर्ज उच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच या प्रकरणाचे आरोपपत्र पोलिसांनी नुकतेच न्यायालयात दाखल केले. त्यामुळे उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रलंबित असलेला अर्ज अद्वय यांनी मागे घेतला आणि जामिनासाठी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पुन्हा अर्ज दाखल केला. न्यायालयाने तपास अधिकारी यांना यासंबंधी नोटीस काढून सोमवारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी म्हणणे मांडण्यास सांगितले होते. मात्र तपास अधिकारी गैरहजर राहिल्याने याप्रकरणी सोमवारी सुनावणी होऊ शकली नाही. आता बुधवारी या अर्जावरील सुनावणी ठेवण्यात आली आहे. अटक झाली तेव्हापासून अद्वय हिरे हे तुरुंगात आहेत.