नाशिक – शहरातील ढासळलेली कायदा व सुव्यवस्था, खड्डेमय रस्ते, कृषिमालासह शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आदी विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी लवकरच संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय शुक्रवारी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसे यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी ठाकरे गट आणि मनसेच्या विभागवार संयुक्त बैठका होणार आहेत. जेणेकरून उभय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा परिचय होईल. या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उभयतांनी ऋणानुबंध घट्ट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची पहिलीच संयुक्त बैठक शुक्रवारी ठाकरे गटाच्या शालीमार येथील कार्यालयात पार पडली. यावे्ळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी दोघे भाऊ एकत्र येत असताना शहराच्या विविध समस्यांसाठी आपणही एकत्रित येत आंदोलन उभारण्याची गरज मांडली. आपण भांडत बसण्यापेक्षा एकत्र येणे आगामी काळात महत्वाचे ठरणार असल्याचा सूर अनेकांनी व्यक्त केला.
ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी शहरातील वाढती गुन्हेगारी, खड्डेमय रस्ते, विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. नागरिकांच्या समस्या वाढत असून पुढील काळात एकत्रितपणे आंदोलन करावे लागणार असल्याचे त्यांनी सूचित केले. जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी महाराष्ट्राच्या मनात दोन्ही भावांंनी एकत्र येऊन नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडावी असल्याचे नमूद केले.
मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनीही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्यासाठी महत्वाच्या असून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. शहरात गुन्हेगारी वाढत असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोर्चातून सरकारला जाब विचारला जाईल, असे त्यांनी नमूद केले. माजी आमदार वसंत गिते यांनी नाशिकमध्ये झालेल्या हनी ट्रॅपची चौकशी करण्याची मागणी केली. एमडी ड्रग्ज प्रकरणात नाशिकचेच नाव बदनाम झाले. हनी ट्रॅपमध्ये त्याची पुनरावृत्ती होत आहे. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांनी केला.
विभागनिहाय बैठका
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी लवकरच संयुक्त मोर्चा काढण्याचे निश्चित केले. या मोर्चाच्या तयारीसाठी आता दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विभागनिहाय संयुक्त बैठका होतील. या बैठकीतून विभाग, प्रभागनिहाय दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा परिचय होणार असल्याचे माजी आमदार वसंत गिते यांनी म्हटले आहे. दरम्यान, मनसेच्या स्थापनेनंतर एकसंघ शिवसेना आणि मनसे यांच्यात फारसे सख्य नव्हते. महापालिकेत पहिल्यांदा सत्ता स्थापन करताना मनसेने शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी आणि भाजपची मदत घेतली होती. मध्यंतरी काळात मनसे, नंतर शिवसेनेतही बरीच फाटाफूट झाली. आगामी निवडणुका लक्षात घेत उभय पक्षातील दरी सांधण्याच्या दिशेने तयारी सुरू झाल्याचे बैठकीत समोर आले.