नाशिक – रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या भूलथापा देत एका बेरोजगार युवकास १४ लाखांना गंडा घालण्यात आला. पैसे दिल्यानंतर तीन, चार वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही. या बदल्यात संशयितांनी दिलेले धनादेश बँकेतून न वटता परत आल्यामुळे युवकाने पोलिसात धाव घेतली. संशयित हे ठाण्यातील असून त्यातील एक तक्रारदाराचे मामा आहेत.
या संदर्भात उज्वल गोसावी (वृंदावननगर, जत्रा-नांदूर लिंक रोड, पंचवटी) यांनी तक्रार दिली. निळकंठ गोसावी, प्रिया गोसावी आणि महेश गोसावी (सर्व कैलास कुंज, कोपरखैरणे, ठाणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तक्रारदार उज्वल यांचे संशयित महेश गोसावी हे मामा आहेत. खासगी नोकरी करणाऱ्या उज्वल यांना काही वर्षापूर्वी नातेवाईक असणाऱ्या संशयितांनी रेल्वेत तिकीट तपासणीस पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. या कामाच्या मोबदल्यात १४ लाख रुपये देण्याचे ठरल्याने तक्रारदार उज्वलने संबधितांकडे संपूर्ण रक्कम सुपूर्द केली होती.
कालांतराने बनावट नियुक्तीपत्र देऊन उज्ज्वल यांना प्रशिक्षणासाठी आधी दिल्ली, नंतर प्रयागराज येथे पाठविण्यात आले होते. या ठिकाणी नियुक्तीचा बनाव उघड झाला. त्यामुळे तक्रारदाराने पैसे परत करण्याचा तगादा लावला. नोव्हेंबर २०२२ मध्ये मामा महेश गोसावी यांनी घरी बोलावून घेतले. पैशांची व्यवस्था करीत असल्याचे सांगून उज्ज्वल यांना निळकंठ आणि प्रिया गोसावी यांनी धनादेश दिले होते. हे धनादेश बँकेत न वटल्याने पुन्हा साई इन्फोटेक या फर्मच्या नावाने दुसरे धनादेश देण्यात आले. मात्र तेही वटले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच उज्ज्वल यांनी पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात ठाण्यातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टोळक्याची कुटुंबियास मारहाण
आगरटाकळी येथील समतानगरात पूर्ववैमनस्यातून तिघांनी घरात शिरून कुटूंबियास मारहाण केली. यावेळी संसारोपयोगी साहित्याची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. याबाबत पंकज सोनवणे (समतानगर) यांनी तक्रार दिली. प्रेम लोखंडे (टाकळीगाव) आणि त्याचे दोन साथीदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोनवणे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. लोखंडे कुटूंबियांशी त्यांचा वाद असून शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. सळई, दगड-विटा घेऊन आलेल्या टोळक्याने घरात प्रवेश करून गोंधळ घातला. सोनवणे यांच्यासह त्यांची आई, अजून एक महिला, स्वयंपाक करणाऱ्या मावशीला टोळक्याने मारहाण केली. घरातील संसारोपयोगी साहित्याची तोडफोड केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाची आत्महत्या
पेठ रस्त्यावरील अश्वमेधनगर भागात ४१ वर्षीय व्यक्तीने गळफास घेतला. त्याच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. जयंत भट (वाडेकर फरसाण जवळ, अश्वमेधनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. जयंत भट यांनी रविवारी सायंकाळी राहत्या घरात पंख्यास ओढणी बांधून गळफास घेतला. हे लक्षात येताच भाऊ विजय चव्हाण यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या बाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.