लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: शहर आणि ग्रामीण भागात अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसला नव्याने उभारी देण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी धडपड सुरू केली आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादी आपली ताकद वाढवित असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अनेक वर्षांपासून निरव शांतता अनुभवण्यास येत होती. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असतानाही जे प्रयत्न प्रभावीपणे झाले नाहीत, ते आता विरोधी पक्षात असताना आणि मुख्यत्वे कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसने सुरू केल्याचे दिसत आहे. अवकाळीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने दुर्लक्ष केल्याचा आक्षेप घेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत चांदवड येथे लवकरच मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

मेळाव्याच्या नियोजनाची माहिती प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते, जिल्ह्याचे प्रभारी डॉ.राजू वाघमारे यांनी दिली. मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठीची डॉ. वाघमारे, सहप्रभारी ब्रिजकिशोर दत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस समितीत बैठक झाली. यावेळी माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी मंत्री डाॅ. शोभा बच्छाव आदी उपस्थित होते. जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या कांदा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मध्यंतरी टोमॅटोला इतके कमी भाव मिळाले की शेतकऱ्यांवर ते फेकून देण्याची वेळ आली होती.

हेही वाचा… नाशिक शहरात अघोषित भारनियमन? तीन-चार तास अनेक भागात वीज खंडित

राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत असून राज्य सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राज्यातील सरकार केवळ घोषणा करण्यातच मग्न आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने बांधावर येऊन दौरा करून गेले. मात्र, ते जाताच पुन्हा गारपीट झाली आणि मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येऊ नये, अशीच शेतकऱ्यांची भावना असल्याचा दावा वाघमारे यांनी केला. शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहील, असा काँग्रेस हा एकमेव पक्ष असून त्यांचे प्रश्न हाती घेण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा… नाशिक: कांदाप्रश्नी प्रहारचे मुंडन आंदोलन, केंद्राच्या धोरणावर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उन्हाळ कांदा बाजारात येत असला तरी त्याला भाव मिळत नाही. टोमॅटो व अन्य भाजीपाल्याची वेगळी स्थिती नाही. नाशिक व शेजारील नगर जिल्ह्यात जो शेतमाल पिकतो, त्याच्या विक्रीची व दराची कायमची व्यवस्था करावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. या अनुषंगाने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत चांदवड येथे पुढील आठवड्यात शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. १५ जूनपूर्वी हा मेळावा होईल. त्यास माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यस्तरीय नेते उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यानंतर नाशिक शहरातील मध्यमवर्गीयांच्या प्रश्नावर येथेही मेळावा घेण्यात येणार आहे. महागाई वाढली असून शहराचा विकास थांबला आहे. मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेस लोकांसमोर जाणार आहे. दरम्यान, प्रदीर्घ काळानंतर काँग्रेसने जिल्ह्यात अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे.