मनमाड – वर्दळीच्या इंदूर -पुणे या राष्ट्रीय महामार्गावर मनमाड ते येवला दरम्यान शनिवारी पहाटे अवजड कंटेनर रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उतरल्याने अपघातग्रस्त झाला. यामुळे मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नागरिकांसह वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदूर -पुणे या राष्ट्रीय महामार्गावर नेहमी छोटे- मोठे अपघात होऊन वाहतूक कोंडी होत असते. वाहनधारकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. गेल्या काही महिन्यांपासून वारंवार असे प्रकार घडत आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे म्हणजे दिव्य परीक्षा ठरते, शनिवारी पहाटे याच महामार्गावर मनमाड जवळ आंबेवाडी फाटा येथे पहाटे पाच वाजता अवजड कंटेनरचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उतरला, अर्धा कंटेनर खड्ड्यात आणि अर्धा कंटेनरचा भाग महामार्गावर आल्याने दुतर्फा वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी धावपळीच्या वेळी ही घटना घडल्याने वाहतुकीवर विपरित परिणाम झाला.
अपघातग्रस्त लांबलचक कंटेनरचा अर्धा भाग रस्त्यावर असल्याने पहाटेपासून वाहतुकीवर परिणाम झाला. चाकरमाने, नोकरदार, विद्यार्थी, बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा नेहमीच सामना करावा लागतो. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि या वाहतूक कोंडीचा फटका बसून प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. इंदूर- पुणे या राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने दळणवळणासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे.पण या महामार्गाला वळण किंवा पर्यायी रस्ता नसल्याने छोटे-मोठे अपघात झाल्यानंतर नेहमीच वाहतुकीची कोंडी होऊन मनमाडवासीयांना त्रास सहन करावा लागतो.
दिवसा अवजड वाहनांना निर्बंधाची मागणी
मनमाड शहरातून जाणाऱ्या महामार्गावर प्रामुख्याने रेल्वे उड्डाण पुलावर अवजड वाहने बंद पडतात आणि वाहतुकीचा कित्येक तास खोळंबा होतो. या प्रश्नावर तात्पुरता मार्ग काढण्यासाठी अवजड वाहतुकीवर दिवसा निर्बंध घालावे, अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे किमान दिवसभर वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण कमी होईल. यासाठी नाशिक शहरात सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत अवजड वाहतुकीस प्रवेश बंद करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा दाखला दिला जातो.
मध्यंतरी रेल्वे उड्डाण पुलाचा काही भाग कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक लासलगांव-येवला मार्गावरून वळविण्यात आली होती. त्याच धर्तीवर दिवसा ज्यांना घाई आहे, त्यांना या मार्गावरून जाण्याची व्यवस्था करावी व अन्य अवजड वाहनांना रात्री सकाळी नऊ ते रात्री आठ ही वेळ सोडून इतर वेळेत मार्गक्रमण करू द्यावे, याकडे लक्ष वेधले जात आहे.