जळगाव : जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादकांना पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेतून मुदत संपल्यानंतरही कोणतीच नुकसान भरपाई इतक्या दिवसांत मिळाली नाही. मात्र, आता संबंधित सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाईची संपूर्ण रक्कम मिळेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे.
जिल्ह्यात २०२४-२५ करिता पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना (आंबिया बहार) अंतर्गत मोसंबी, डाळिंब, केळी, आंबा आणि पपई या अधिसूचित फळपिकांचा समावेश करण्यात आला होता. आणि सदरची योजना भारतीय कृषि विमा कंपनीमार्फत राबविण्यात आली. मात्र, हवामान बदलामुळे झालेल्या फळपिकांच्या नुकसान भरपाईची विमा रक्कम सदर कंपनीकडून अद्याप वितरीत झालेली नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून शेतकऱ्यांना विमा रकमेची भरपाई मिळवून देण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे.
या विषयाकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे तसेच खासदार स्मिता वाघ आणि जिल्ह्यातील सर्व आमदारांनी या फळपिक विमा भरपाई प्रकरणी जिल्हाधिकारी आणि कृषी विभागासोबत नियमित बैठका घेऊन भारतीय कृषी विमा कंपनीला तत्काळ नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, विमा कंपनीकडून नुकतीच हेक्टरी पे-आऊट रक्कमेची माहिती प्राप्त झाली असली, तरी ती अद्याप अपूर्ण आहे. त्यामुळे संपूर्ण आणि अचूक माहिती मिळविण्यासाठी कृषी विभागाकडून कंपनीशी सतत संपर्क साधला जात आहे.
तसेच, १२ ऑक्टोबरला पीक विमा कंपनीकडून प्राप्त ई-मेल संदेशानुसार, सन २०२४-२५ मधील आंबिया बहार अंतर्गत उर्वरित महसूल मंडळांचे दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सध्या प्रगतीपथावर आहे. हवामान डेटा, विन्डस् प्रणालीतील मॅपिंग, एडब्ल्यूएस डेटा, बीडब्ल्यूएस उपलब्धता इत्यादी तांत्रिक आवश्यकतेनुसार पात्र दावे निकाली काढण्याचे काम सुरू आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांचे दावे दिवाळीपूर्वी निकाली काढण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जात आहे, असेही भारतीय कृषी विमा कंपनीने स्पष्ट केल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चाला यश
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात केळी उत्पादकांना दरवर्षी फळपीक विम्याचा लाभ मिळत असे. मात्र, यंदा संबंधित विमा कंपनीने मुदत संपल्यानंतरही पात्र महसूल मंडळांची यादी जाहीर केली नाही. केळी उत्पादकांना फळपीक विम्याची रक्कम मिळण्यात झालेल्या विलंबाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर जळगावमध्ये काही दिवसांपूर्वी प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू आणि शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढला. त्यानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केळी पीक विम्याचा प्रश्न सोडविण्याबाबतचे निवेदन दिले होते.