जळगाव – प्रांजल खेवलकर यांच्या भ्रमणध्वनीमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि चित्रफिती आढळल्याचा आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केल्यानंतर एकनाथ खडसे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले. दरम्यान, चाकणकर यांच्यावर टीका करताना खडसे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप करून भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्यांच्या व्यंगचित्राला जळगाव शहरात शाई फासली.

प्रांजल खेवलकर यांच्या घरातून जप्त केलेल्या भ्रमणध्वनीमध्ये महिलांसोबत केलेल्या चॅटचे स्क्रिनशॉट, नग्र आणि अर्धनग्न छायाचित्रे आणि काही अशोभनीय कृत्याच्या चित्रफिती आढळून आल्या आहेत. त्याच मुद्द्यावरुन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी खळबळजनक आरोप करून हे प्रकरण तापवले आहे. त्याविषयी प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी जावयाची बाजू उचलून धरतानाच चाकणकर यांना तुम्ही अशा प्रकारे बोलता जशा काही स्वतः चौकशी अधिकारी आहात, असा टोला हाणला. त्यांचा संताप याच्यासाठी आहे की त्यांचे आणि रोहिणी खडसे यांचे अतिशय मैत्रीपूर्ण (?) संबंध आहेत. आणि हे सर्वांना माहिती असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, चाकणकर यांच्याविषयी बोलताना खडसे यांची जीभ घसरली. त्यांच्याविषयी त्यांनी अपशब्द वापरले. त्यामुळे खडसे यांनी चाकणकर यांची जाहीर माफी मागावी. महिलांचा अपमान अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अशा घोषणा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जळगावमध्ये शुक्रवारी दिल्या. प्रसंगी भाजपच्या महिला पदाधिकारींनी एकनाथ खडसे यांच्या व्यंगचित्राला शाई फासली. यावेळी उज्ज्वला बेंडाळे, रेखा वर्मा, भाजपचे पश्चिम जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, आमदार सुरेश भोळे, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख आदी उपस्थित होते.

हनी ट्रॅपसह पुणे रेव्ह पार्टी प्रकरणावरून जिल्ह्याचे राजकारण तापले असताना मंत्री गिरीश महाजन आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक युद्धाने विखारी वळण घेतले आहे. या पार्श्वभूमीवर, जळगावमधील लोकप्रतिनिधींचे विकासाकडे लक्ष कमी आणि दुसऱ्या गोष्टींकडे जास्त असल्याची खंत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी शुक्रवारी व्यक्त केली. एकीकडे सासरे आणि दुसरीकडे पक्षाचे नेते असताना दोघांना त्यांनी घरचा आहेर दिला. त्याच दिवशी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकनाथ खडसे यांच्या प्रतिमेला जळगावमध्ये शाई फासली. त्यामुळे खडसे आणि महाजन यांच्यातील वाद इतक्या सहजासहजी थांबण्याची शक्यता आता मावळली आहे.