जळगाव – शहरातील विविध गणेश मंडळांतर्फे शनिवारी गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार असून, सकाळी १० वाजता महापालिकेच्या आवारातील मानाच्या गणपतीची सर्वप्रथम आरती होईल. त्यानंतर न्यायालय चौकातून विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होईल. विसर्जन मार्गावर ठिकठिकाणी सुरक्षेसाठी बॅरिकेटस लावून प्रकाश योजना करण्यात आली आहे.

मेहरुण तलावावरील गणेश घाट आणि सेंट टेरेसा शाळेजवळील काठावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी सात तराफे, सहा क्रेन आणि एक बोट तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सराईतपणे पोहणारे १०० जीव रक्षक तैनात राहणार आहेत. लाठी शाळा, पांझरापोळ शाळा, पिंप्राळ्यातील शाळा, निमखेडी गट क्रमांक १०१ येथील पाण्याची टाकी, नाभिक समाज सभागृह आणि शिवाजीनगर येथे मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यासाठी महापालिकेने ४५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्माल्य संकलनासाठी महापालिका कर्मचारी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, विविध गणेश मंडळांचे स्वयंसेवक आणि गणेश भक्त सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.

दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत वीज वाहिन्या, विद्युत खांब तसेच ट्रान्सफॉर्मर आदी वीज यंत्रणेजवळून जाताना विशेष दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे. मिरवणुकीदरम्यान उंच रथ, सजावट केलेले मंडप, झेंडे किंवा पताका यांचा संपर्क वीज वाहिन्यांशी आल्यास अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे गणेश मंडळांनी मिरवणुकीच्या मार्गावर वीज वाहिन्या आणि विद्युत उपकरणांपासून आवश्यक तेवढे अंतर ठेवणे गरजेचे आहे.

झेंडे, पताका यांना शक्यतो स्टीलचे रॉड वापरले जातात. स्टील हे वीजवाहक असल्याने प्रसंगी जीवित हानी होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे स्टील रॉडच्या ऐवजी लाकडी अथवा पीव्हीसी पाईप वापरावेत. कुठेही वीजवाहक तारा तुटल्याचे दिसल्यास लगेच महावितरणच्या आपत्कालीन १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५, या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन महावितरणने केले आहे.

जळगाव जिल्ह्यात यंदा सुमारे दोन ९४६ गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. त्या पैकी २०८९ मंडळे सार्वजनिक तर ६९७ मंडळे खासगी स्वरूपाची आहेत. याशिवाय, १६० गावांमध्ये एक गाव एक गणपती आहेत. पैकी काही मंडळांनी पाचव्या आणि सातव्या दिवशीच गणेश विसर्जन केले आहे. त्यानुसार, तीन पोलीस उपअधीक्षक, १० उपनिरीक्षक, १०० अंमलदार, एक एसआरपीएफ कंपनी आणि सुमारे १८०० गृह रक्षक दलाचे जवान (महिला आणि पुरुष) तैनात करण्यात आले आहेत. स्वतः पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी जातीने लक्ष ठेवून आहेत.

गणेश मंडळांचा परिसर, मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनचा वापर करून सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर पोलीस प्रशासनाचा भर आहे.