जळगाव : जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युतीच्या माध्यमातून लढल्या जातील, असा दावा भाजपसह शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) पक्षश्रेष्ठी करत आहेत. दुसरीकडे, शिंदे गटाच्या आमदारांनी स्वबळाची भाषा करून युतीच्या प्रयत्नांना सुरूंग लावला आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात युती होणार किंवा नाही त्याबद्दल मोठे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती व्हावी म्हणून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते मंत्री गुलाबराव पाटील प्रयत्न करत असताना, त्यांच्याच पक्षाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाची भाषा करून बंड पुकारले आहे. तेवढ्यावरच न थांबता शिवसेना आणि मित्र पक्षांना संपवायचे, ही भाजपची रणनिती असल्याचा खळबळजनक आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती झाली पाहिजे, हे नेत्यांचे वैयक्तिक मत आहे. मात्र, पाचोरा-भडगाव मतदारसंघात शिंदे गट कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणूक सवबळावर लढणार असल्याची थेट घोषणा त्यांनी केली आहे. माझ्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढणारी बहीण वैशाली सूर्यवंशी, माजी आमदार दिलीप वाघ तसेच प्रताप पाटील आणि अमोल शिंदे यांच्या बरोबर राहून मी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढू शकत नाही. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांकडून अंत्यविधीची तयारी करून घेण्यापेक्षा समोरून त्यांच्याशी लढणे केव्हाही चांगले. किमान सावध तरी राहता येईल, असेही विधान आमदार पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, आमदार किशोर पाटील यांना प्रत्युत्तर देताना भाजपने त्यांच्यासाठी आमची दारे केव्हाही खुली असतील, असा सावध पवित्रा आता घेतला आहे. मात्र, आमदार पाटील यांनी भाजपवर अविश्वास दर्शवित शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि मित्र पक्षांना संपविणे, हीच भाजपची पॉलिसी असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच जेवढ्या काही ठिकाणी सध्या शिंदे गटाचे आमदार आहेत, त्याठिकाणी गोड बोलून त्यांची माणसे पेरण्याचे काम भाजप करत आहे. मागील विधानभा निवडणुकांचे अनुभव लक्षात घेता त्यांच्यावर यापुढील काळात भाजपवर विश्वास ठेवणे म्हणजे विषाची परीक्षा घेण्यासारखे असल्याचेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, त्यांनी (शिंदे गट) आमच्यासाठी दारे बंद केली असतील तर आम्ही काय त्यांच्या मागे फिरणार नाही. ते स्वबळाची भाषा करत असतील तर आम्हाला सुद्धा नाईलाजाने भाजप म्हणून लढावे लागेल, असे मोठे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढायच्या आहेत, असे वारंवार सांगितले आहे. ज्या ठिकाणी फारच काही ताणाताण असेल किंवा जमतच नसेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढती लढू, असे आमच्या नेत्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. पाचोरा मतदारसंघातही आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढण्याच्या मनःस्थितीत होतो. परंतु, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे आधीच सांगून टाकले आहे. त्यामुळे आम्हालाही लढण्याची तयारी करावी लागेल. त्यासाठीच आम्ही पाचोरा शहरात भाजप कार्यालय सुरू केल्याचे मंत्री महाजन म्हणाले.
