जळगाव : माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर ऑनलाईन फसवणुकीच्या उद्देशाने चालविल्या जाणाऱ्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी रविवारी छापा टाकला होता. या प्रकरणी अटकेत असलेले माजी महापौर कोल्हे यांच्यासह आठ संशयितांना न्यायालयाने सोमवारी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना शनिवारी कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर चालविले जात असल्याबाबतची गोपनीय माहिती मिळाली होती. त्या आधारे नखाते यांनी रविवारी एल.के. फार्म हाऊसवर छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी ३१ लॅपटॉप आणि कॉल सेंटरची आधुनिक यंत्रणा आढळून आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत सदरचे कॉल सेंटर खास करून विदेशी लोकांची फसवणूक करण्यासाठी सुरू केल्याचे स्पष्ट झाले.

कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत एजंट असल्याचे सांगून डेटा चेक करण्याच्या बहाण्याने किंवा इतर आकर्षक आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना गंडवित होते. दोन लॅपटॉपवर पैशांचे व्यवहारही झाल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी अटक केलेल्या कोल्हे यांच्या व्यतिरिक्त अन्य संशयित हे कोलकाता येथील रहिवाशी आहेत.

दरम्यान, पोलिसांना माजी महापौर कोल्हे आणि इतर संशयितांच्या विरोधात संघटित गुन्हेगारीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यांर्तगत गुन्हा दाखल केला आहे. सर्व संशयितांना सोमवारी न्यायालयात हजर केल्यावर या प्रकरणात आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करून पुढील तपासासाठी संबंधितांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी पोलिसांकडून करण्यात आली. मात्र, माजी महापौर कोल्हे यांच्यासह अन्य संशयितांच्या वकीलांनी पोलिसांच्या मागणीवर आक्षेप नोंदवत न्यायालयासमोर जोरदार युक्तीवाद केला. अखेर बोगस कॉल सेंटर चालविल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले कोल्हे आणि इतरांची चार ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

दरम्या, शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या कोल्हे यांच्यावरील पोलीस कारवाईनंतर जळगावचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. विधानसभेचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतरची २००९ ची पहिली निवडणूक कोल्हे यांनी लढली होती. मात्र, पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर त्यांनी २०१४ मध्ये जळगाव शहरातून मनसेची उमेदवारी केली. त्यावेळी त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची सभा जळगावात झाली होती. परंतु, दोन वेळा लढल्यावरही कोल्हे यांचे आमदारकीचे स्वप्न पूर्ण झाले नाही. आमदारकीचा नाद सोडून त्यांनी नंतरच्या काळात जळगाव महापालिकेवर लक्ष केंद्रीत केले. २०१७ मध्ये ते खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्याने जळगावचे महापौर बनले. मनसेची शिडी वापरून महापौर पदापर्यंत मजल मारल्यावर २०१८ मध्ये मात्र कोल्हे यांनी काही नगरसेवकांना बरोबर घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला. अर्थात, भाजपमध्येही ते जास्त दिवस रमले नाहीत. सध्या शिवसेनेत (एकनाथ शिंदे) सक्रीय असलेले कोल्हे हे जळगाव महापालिकेची आगामी निवडणूक लढण्याच्या तयारीत होते.