जळगाव : शहर व जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणुका चालल्या. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन तसेच आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण आणि इतर लोकप्रतिनिधींनी ठेका धरत कार्यकर्त्यांचा उत्साह वृद्धिंगत केला. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी पदाचा बडेजाव न मिरवता ढोल वाजवून मिरवणुकांची रंगत आणखी वाढवली.

महानगरपालिकेच्या आवारातील मानाच्या गणपतीची महाआरती आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे तसेच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर शनिवारी सकाळी दहा वाजता शिवतीर्थ मैदानावरून विसर्जन मिरवणुकांची सुरुवात झाली. टाळ, मृदंग, ढोल-ताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकांमध्ये भक्तीभाव आणि जल्लोषाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा गणेश भक्तांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. महापालिकेतील मानाच्या गणपती पाठोपाठ शहरातील सर्वच गणेश मंडळे गोविंदा रिक्षा स्टॉप, नेहरू चौक, महापालिका इमारत, शास्त्री टॉवर चौक, सानेगुरुजी चौक, भिलपुरा चौक, सराफ बाजार, पांडे डेअरी चौक, सिंधी कॉलनी आणि शिरसोली नाका, या मार्गे मेहरूण तलावाकडे शिस्तबद्धपणे रवाना झाली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

यंदा मेहरुण तलावावरील गणेश घाट आणि सेंट टेरेसा शाळेजवळील काठावर गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी सात तराफे, सहा क्रेन आणि एक बोट तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सराईतपणे पोहणारे १०० जीव रक्षक तैनात होते. लाठी शाळा, पांझरापोळ शाळा, पिंप्राळ्यातील शाळा, निमखेडी गट क्रमांक १०१ येथील पाण्याची टाकी, नाभिक समाज सभागृह आणि शिवाजीनगर येथे मूर्ती संकलन केंद्रे उभारण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेने ४५ कर्मचारी नियुक्त केले आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान निर्माल्य संकलनासाठी महापालिका कर्मचारी, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सदस्य, विविध गणेश मंडळांचे स्वयंसेवक आणि गणेश भक्त सक्रिय सहभाग नोंदविताना दिसून आले.

सुमारे ५६ टन निर्माल्याचे संकलन

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले. गणेश विसर्जनानंतर हार, फुले, माळा आणि पूजा साहित्याचे संकलन करण्यासाठी अभियानाच एकूण १,४१२ स्वयंसेवक सहभागी झाले होते. शहरात ११ प्रमुख ठिकाणी संकलन केंद्र उभारण्यात आली होती. सकाळी १० ते रात्री उशिरापर्यंत अखंड निर्माल्य संकलन करण्यात आले. त्यानुसार, यंदा जळगाव शहरातून सुमारे ५६ टन निर्माल्याचे संकलन झाले. त्यापैकी सावखेडा-प्रिंप्राळा येथे साडेआठ टन तसेच मन्यारखेडा येथे १०.५० टन निर्माल्य संकलित झाले. शिवाजी उद्यानावर निर्माल्य प्रक्रिया केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याठिकाणी आता निर्माल्यापासून उपयुक्त खत तयार केले जाणार आहे.

एक हजार रोपांचे वाटप

जळगावात भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन आणि युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या विद्यमाने गेल्या १७ वर्षांपासून काव्यरत्नावली चौकात आदर्श गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मंडळातर्फे रोपांच्या सहाय्याने बल्लाळेश्वर गणेशाची सजीव प्रतिकृती साकारण्यात आली होती. वृक्ष संवर्धनासह पर्यावरणाचा संदेश त्यातून दिला गेला. विसर्जनाच्या दिवशी एका परिवारास एक रोप, या प्रमाणे एक हजार रोपांचे वाटप करण्यात आले. सजीव बल्लाळेश्वरासाठी वापरलेली रोपे प्रसाद स्वरूपात घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कुंड्यांसह एक हजार रोपांचे वाटप केले गेले. यावेळी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, मंगलसिंग राठोड, देवेंद्र पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे विराज कावडिया यांच्यासह सदस्य उपस्थित होते.