जळगाव – जिल्ह्यातील यावल तालुक्यात चिंचोली येथे बियर दिली नाही म्हणून एका हॉटेल मालकावर गेल्या महिन्यात गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत एकूण पाच जणांना अटक केली आहे. राजकीय वैमनस्यातून पुनगाव येथील एका सरपंचाने सुपारी देऊन हा गोळीबार घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

प्रमोद श्रीराम बाविस्कर (५०) यांचे चिंचोली गावाजवळील आडगाव फाट्यावर रायबा नावाचे हॉटेल आहे. १० जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेल बंद करून घरी जात असताना दोन अनोळखी दुचाकीस्वारांनी त्यांना बियर मागितली. मात्र, बाविस्कर यांनी हॉटेल बंद झाल्याने बियर देण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्याचा राग आल्याने दुचाकीवरील एकाने बाविस्कर यांच्यावर गावठी बंदुक रोखली. आणि त्यांच्यावर अगदी जवळून दोन गोळ्या झाडल्या. त्यापैकी एक गोळी मानेला लागल्याने गंभीर जखमी झालेले बाविस्कर यांच्यावर जळगावमध्ये उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या गुन्ह्याच्या तपासाविषयी माहिती दिली. प्रमोद बाविस्कर यांच्यावरील गोळीबार प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, यावल पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजयकुमार वाढवे, उपनिरीक्षक शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वल्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पथके तयार करून नाशिक, उमर्टी आणि अडावद येथे पाठवण्यात आली होती. त्यातूनच आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संशयित किशोर बाविस्कर हा पुनगाव येथील सरपंच असून, त्याचे आणि हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर यांचे राजकीय वैर होते. प्रमोद बाविस्कर यांचा बदला घेण्यासाठी किशोर बाविस्कर याने अडावद येथील रवींद्र देशमुख याला सुपारी दिली. त्यासाठी त्याने देशमुखला युपीआयने सुमारे ५० हजार रुपये पाठविले होते. त्यानंतर देशमुख याने विनोद आणि सुनील पावरा यांना प्रमोद बाविस्कर यांच्या हत्येची सुपारी दिली.

पोलीस पथकाने दर्शन रवींद्र देशमुख (२५, रा. देशमुख वाडा, अडावद, ता. चोपडा), गोपाल संतोष चव्हाण (२५, रा. अडावद, ता. चोपडा), किशोर मुरलीधर बाविस्कर (४०, रा. कोल्हे हिल्स, जळगाव), विनोद वसंतराव पावरा (२२, रा. अमलवाडी, ता. चोपडा), सुनील सुभाष पावरा (२२, रा. उमर्टी, ता. चोपडा) यांना अटक केली आहे. पोलिसांनी पुढील तपासाला आणखी गती दिली आहे.