जळगाव : तालुक्यातील शिरसोली (प्र.न.) येथील नेव्हरे धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. तर मंगळवारी लमांजन येथील गिरणा नदीत बुडालेल्या प्रौढाचा बुधवारी मृतदेह सापडला. दोन्ही प्रकरणांची औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद घेण्यात आली आहे.
शरद राजाराम सुने (३१, रा. शिरसोली, ता. जि. जळगाव) असे नेव्हरे धरणात बुडाल्याने मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास शरद हा गावातील भिका वसंत शिंपी (४५) आणि अशोक सखाराम भिल (५०) यांच्याबरोबर धरणावर पोहण्यासाठी गेला होता. परंतु, पाण्यात उतरल्यानंतर शरदला खोलीचा अंदाज आला नाही आणि तो पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. त्याच्या सोबतच्या दोघांनी तातडीने गावाकडे धाव घेतली.
घडलेली घटना शिरसोलीचे पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना सांगितली. गावातील एक तरूण नेव्हरे धरणात बुडाल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी नेव्हरे धरणाकडे तत्काळ धाव घेतली. त्यानंतर सराईत पोहणाऱ्यांनी पाण्यात बुडालेल्या शरदला बाहेर काढले. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल केल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. शरद हा त्यांच्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याच्या मृत्युने शिरसोली गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मजुराचा गिरणा नदीत बुडून मृत्यू
दुसऱ्या घटनेत जळगाव तालुक्यातील लमांजन येथील एका मजुराचा गिरणा नदीवर आंघोळीसाठी गेल्यानंतर पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. जयसिंग सुभाष बारेला (४०, रा. शिरवेल, मध्य प्रदेश) असे मृताचे नाव आहे. बारेला कुटुंब लमांजन येथे शेत मजुरीसाठी वास्तव्यास आहे. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास बारेला हे गिरणा नदीकाठावर आंघोळीसाठी गेले होते. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांची वृद्ध आई आणि बहिणीला चिंता वाटू लागली.
दोघींनी नदीपात्र परिसरात पाहणी केली असता, नदीच्या किनाऱ्यावर जयसिंग यांचे कपडे आणि भ्रमणध्वनी दिसून आला. जयसिंग नदीत बुडाल्याचा संशय आल्याने त्यांची आई आणि बहिणीने तातडीने लमांजन गावाचे पोलीस पाटील भाऊराव पाटील यांना माहिती दिली. त्यानुसार, रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात जयसिंग यांचा शोध घेण्यात आला. मात्र, ते कोठेच आढळून आले नाहीत. अखेर बुधवारी सकाळी गिरणा नदी पात्रातून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी बारेला कुटुंबियांनी आक्रोश केला.
