जळगाव – विधानसभेच्या निवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागल्यापासून अनेक दिग्गजांनी सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसला गळती लागली आहे. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रातील आणखी एक ज्येष्ठ नेता पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जो शरद पवार गटासाठी आणखी मोठा धक्का असणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जळगाव जिल्हा बैठक प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत गुरूवारी उत्साहात पार पडली. ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे, राज्यसभेचे माजी खासदार ईश्वर जैन, माजी आमदार संतोष चौधरी, राजीव देशमुख, डॉ. बी. एस. पाटील आदींसह इतर प्रमुख पदाधिकारी आणि नेते त्या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले.

मात्र, विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि शरद पवारांचे सुरूवातीपासूनचे खंदे समर्थक मानले जाणारे पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण गुजराथी बैठकीला अनुपस्थित राहिले. त्यामुळे बैठतीला उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले. एरवी सतत एका मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणारे गुजराथी खासकरून विधानसभा निवडणुकीपासून पक्षात फार सक्रीय दिसत नव्हते. प्रदेशाध्यक्ष जळगाव दौऱ्यावर असतानाही त्यांनी शरद पवार गटाच्या बैठकीपासून लांब राहणे पसंत केले.

माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे आणि तीन दिवसांपूर्वी अरूण पाटील यांनी पक्ष सोडल्याने आधीच शरद पवार गट खिळखिळा झाला आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते अरूण गुजराथी यांची भर पडण्याची शक्यता व्यक्त होत असताना, पक्ष संघटनेला त्याची मोठी किंमत चुकवावी लागणार आहे.

गुजराथी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीपासून शरद पवार यांना दिलेली साथ आजतागायत कायम होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही गुजराथी पवार यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले. शांत आणि संयमी व्यक्तिमत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या गुजराथी यांनी राजकारणात कोणाशी सहसा कटुता बाळगली नाही. साधारण आठ वर्षांपूर्वी चोपड्यात त्यांचा अमृत महोत्सव आयोजित केला होता. तिथे केवळ शरद पवारच नाही तर विधानसभेचे तत्कालिन अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासारखी अनेक राजकीय पक्षांची नेते मंडळी उपस्थित होती.

विशेष म्हणजे त्यावेळी सर्वांनी अरूण गुजराथी यांच्याकडून कर्तृत्व आणि विनम्रता, या गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे जाहीरपणे नमूद केले होते. गुजराथी हे सत्तेत असो किंवा नसो, पण समाजकारण करणारा एक चांगला माणूस त्यांचा आदर केल्याशिवाय राहणार नाही, असे गौरवोद्गार खुद्द पवार यांनी त्या प्रसंगी काढले होते.

दरम्यान, गुजराथी यांनी सत्काराला उत्तर देताना आपण मागत नसताना सर्व काही मिळाले आणि ते शरद पवार यांनी दिले. चोपडा शहराचा नगराध्यक्ष ते विधानसभा अध्यक्ष, विठ्ठल मंदिराचे सभागृह ते इंग्लंडमधील कॉमन हाऊसपर्यंत त्यांनी मला पोहचविले, असे बोलून कृतज्ञता व्यक्त केली होती. तेच गुजराथी आज शरद पवार यांची साथ सोडून जात असल्याची चर्चा कानी पडल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, गुजराथी यांनी स्वतः त्यांच्या विषयी सुरू असलेल्या चर्चांचे खंडन केले आहे.

शरद पवार यांनी आजपर्यंत भरपूर काही दिले. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा अन्य दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्न येत नाही. मात्र, आता मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर प्रेम करणारे, कार्यकर्ते कोणत्याही पक्षात गेले तरी मी फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिल. -अरूण गुजराथी (ज्येष्ठ नेते- राष्ट्रवादी शरद पवार गट)