नाशिक : अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन करताना शहर व ग्रामीण भागात पाच जण बुडाले. यातील तीन जणांचे मृतदेह सापडले असून अन्य घटनांमध्ये वाहून गेलेल्या दोघांचा शोध सुरू आहे. यंदा पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे जलाशय तुडुंब भरलेले आहेत. विसर्गामुळे गोदावरी, दारणासह अनेक नद्या, नाले दुथडी भरून वहात आहे. त्यामुळे या क्षेत्रात गणेश विसर्जनावेळी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते.
स्थानिक पाझर तलाव, बंधाऱ्यांवर विसर्जनास प्रतिबंध करण्याची सूचनाही करण्यात आली. तथापि, गणेश भक्तांकडून याकडे दुर्लक्ष झाल्याची परिणती दुर्घटनांमध्ये झाली. शहरातील आनंदवल्ली येथे गोदावरी नदीच्या प्रवाहात सातपूर कॉलनी येथील शुभम पाटील (४०) आणि प्रवीण चव्हाण (२५, मालेगाव) हे दोघे वाहून गेले. पाण्याच्या जोरदार प्रवाहात शुभम पाटील पोहत बाहेर आल्याने बचावला. परंतु, प्रवीण चव्हाण वाहून गेला. रविवारी अग्निशमन दलाचे जवान व आपदा मित्र यांच्यामार्फत शोध मोहीम सुरू होती. दुसरी घटना म्हसरूळ येथील बोरगड भागात घडली. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पाठीमागील भागात पाण्याने भरलेल्या खदानीत बुडून चंदन माळेकर (२९, म्हसोबा वाडी, बोरगड) याचा मृत्यू झाला. मित्रांसोबत तो गणेश विसर्जनासाठी या भागात गेला होता. या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तिसरी घटना नाशिक तालुक्यातील गोवर्धन शिवारात घडली. विष्णू डगळे (३४, गंगापूर) हे गणपती विसर्जनावेळी वाहून गेल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिली. सिन्नर शहरातील सरदवाडी बंधाऱ्यात गणपती विसर्जन करताना ओमप्रकाश लिलहारे (३७, पास्ते) यांचा बुडून मृत्यू झाला. कळवण तालुक्यातील देसराने येथे पुनद नदीत गणेश विसर्जन करताना पाय घसरून नदीत बुडून दिनेश राजभोज (३९) यांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राने दिली.
पेठ तालुक्यात गुराखी वाहून गेला
पेठ तालुक्यातील गारमाळ शिवारात नाल्याला आलेल्या पूरात बुडून नंदराज कहांडोळे (३२, गारमाळ) या गुराख्याचा मृत्यू झाला. नंदराज कहांडोळे हे शनिवारी सायंकाळी बैल चारून घरी परतत होते. परिसरातील बंधारा तुडूंब भरून वहात होता. यामुळे नाल्याला पूर आला होता. या पुरात नंदराज हे वाहून गेले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. या बाबत कुटुंबियांनी खबर दिली. या बाबत पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.