जळगाव – पाणलोट क्षेत्रातील मध्य प्रदेशात तसेच विदर्भात आणि जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी, हतनूरचे ४१ पैकी १४ दरवाजे रविवारी सकाळी एक मीटरने उघडण्यात आले असून, तापीसह पूर्णा नदीला त्यामुळे पूर आला आहे. दोन्ही नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारलेली असली तरी पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस होत असल्याने तापीवरील हतनूरच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येत होते. पाटबंधारे विभागालाही वेळोवेळी धरणाचे काही दरवाजे उघडून विसर्ग नियंत्रित करावा लागला होता. दरम्यानच्या काळात पाण्याची आवक थोडी कमी झाल्याने हतनूरचे बहुतांश दरवाजे बंद करून केवळ दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडे ठेवण्यात आले. मात्र, आता पुन्हा पाण्याची आवक वाढल्याने हतनूर धरणातील उपयुक्त पाणी साठा झपाट्याने वाढताना दिसून आला आहे. पाटबंधारे विभागाला त्यामुळे १६ दरवाजे एक मीटरने उघडून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
जळगाव जिल्ह्यातही महिनाभराच्या खंडानंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाल्याने हतनूरच्या पाणी पातळी चांगली वाढ होण्यास मदत झाली आहे. सद्यःस्थितीत हतनूर धरणाचे ४१ पैकी १४ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले असून तापी नदीच्या पात्रात २८ हजार ७५ क्यूसेक इतका विसर्ग सुरू आहे. पुढील काही तासांत ५० हजार ते ७५ हजार क्यूसेकपर्यंत विसर्ग हतनूर धरणातून सोडला जाण्याची शक्यता आहे.
नदी काठावरील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जळगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. विनाकारण नदी पात्रात न जाण्याचा सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहेत.
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापक केंद्रांवर रविवारी सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार, गेल्या २४ तासात बऱ्हाणपुरात १७.४, देढतलाई येथे २९.८, टेक्सा येथे ३.२, एरडी येथे २१.४, गोपालखेडा येथे ७९.६, चिखलदऱ्यात १.८, लखपुरीत ५६.८, लोहाऱ्यात २७.०, अकोल्यात ५५.४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद घेण्यात आली. दरम्यान, हतनूर धरणाचा विसर्ग वाढल्यानंतर खाली शेळगाव येथे तापी नदीवर उभारलेल्या बॅरेजचेही सहा दरवाजे आता एक मीटरने उघडण्यात आले आहेत. वाढता विसर्ग लक्षात घेता तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसानंतर पाण्याची पातळी वाढल्यास हतूनर आणि शेळगाव बॅरेजमधील विसर्ग आणखी वाढवला जाऊ शकतो, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.