लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) निर्मित आणि नाशिकचे दत्ता पाटील लिखित, सचिन शिंदे दिग्दर्शित ‘कलगीतुरा’ या नावाजलेल्या संगीतमय नाटकाची नवी दिल्लीतील एनएसडी अर्थात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील २४ व्या भारतीय रंग महोत्सवासाठी निवड झाली आहे.

विशेष म्हणजे, ‘हंडाभर चांदण्या’, ‘तो राजहंस एक’ यानंतर पाटील-शिंदे जोडीचे सलग तिसरे नाटक भारंगम महोत्सवासाठी निवडले गेले आहे. नऊ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी दिल्लीतील श्रीराम सेंटर येथे सायंकाळी पाच वाजता कलगीतुरा नाटक सादर होईल. अनेक पुरस्कारांनी नावाजलेल्या या नाटकाचा प्रयोग नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या मानाच्या इंडियन हॅबिटॅट सेंटरच्या राष्ट्रीय महोत्सवात झाला होता.

आणखी वाचा-राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (देवळा) येथील कलगीतुरा परंपरेच्या पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांचा, कारणांचा आणि या लोकपरंपरेचा अभ्यास करून दत्ता पाटील यांनी ही संहिता लिहिली आहे. तब्बल २२ कलावंतांचा समावेश असलेले हे लोकसंगीतमय समकालीन भाष्य करणारे नाटक सचिन शिंदे यांनी दिग्दर्शित केले. एनसीपीएच्या ‘दर्पण’ लेखन उपक्रमात विजेत्या ठरलेल्या या नाटकाची एनसीपीएचे प्रमुख ब्रुस गुथरी आणि मराठी नाटक विभागाच्या व्यवस्थापक राजश्री शिंदे यांनी निर्मिती केली.

कलगीतुरा हा महाराष्ट्रातील विविध प्रांतांच्या बोलीभाषांमधून, लहेजातून लिहिलेल्या शाहिरी लावण्यांचा, विशेषतः आध्यात्मिक लावण्यांचा प्रकार आहे. गावागावांतून बहुजन शेतकरी बांधव कलगीतुऱ्याच्या माध्यमातून या लावण्या सादर करत, काही कूटप्रश्न या लावण्यांमधून एकमेकांना विचारत. त्यातून उत्तरे मिळवतात. ही परंपरा कालांतराने लोप पावली. परंतु, दोन दशकांनंतर नव्या पिढीतील काही ग्रामस्थांनी ही परंपरा शोधून पुन्हा प्रवाही केली. परंपरेच्या, जगण्याच्या हरवलेल्या लयीच्या या पुनरूत्थानाची ही कथा म्हणजे ‘कलगीतुरा’ होय.

आणखी वाचा-नाशिक : जिल्ह्यात शंभर दिवसांसाठी क्षयरोग जागृती मोहीम

गढीवरच्या पोरी, हंडाभर चांदण्या, तो राजहंस एक, दगड आणि माती यांसारखी एकाहून एक सरस नाटके मराठी प्रायोगिक रंगभूमीला देणाऱ्या दत्ता पाटील आणि सचिन शिंदे या जोडीचे ‘कलगीतुरा’ हे नवी दिल्लीतील भारंगम आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवडले जाणारे तिसरे नाटक आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक कलावंतांचा सहभाग

कलगीतुरा नाटक संपूर्णपणे नाशिकचे आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या नाटकाची पार्श्वभूमी ही नाशिक जिल्ह्यातील उमराणे येथील आहे. नाटकाचे लेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे नाशिकचेच. नाटकात हेमंत महाजन, विक्रम ननावरे, नीलेश सूर्यवंशी, राम वाणी, अरूण इंगळे, ऋषिकेश शेलार, राजेंद्र उगले, कृष्णा शिरसाठ, प्रवीण जाधव, शुभम लांडगे, किरण राव, श्रुती कापसे, कविता देसाई, ऋषिकेश गांगुर्डे या नाशिक जिल्ह्यातील विविध भागांतील कलावंतांच्या भूमिका आहेत. ऋषिकेश शेलार यांचे संगीत असून रोहित सरोदे संगीत संयोजक आहेत. प्रणव सपकाळे यांची प्रकाश योजना असून चेतन बर्वे-लक्ष्मण कोकणे यांचे नेपथ्य आहे.