नाशिक – नवीन नाशिक परिसरातील पिंपळगाव खांब येथील शेतात वन विभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता.
नाशिक बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या पिंपळगाव खांब येथील शेतात बिबट्याचा वावर वाढला होता. बिबट्या दिसू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याने शेतमजुरावर हल्ल्याचाही प्रयत्न केला होता. बिबट्याच्या संचारामुळे स्थानिकांसह पशु धनालाही इजा पोहचण्याची शक्यता निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी वनविभागाकडे केली होती. त्यानुसार चुंभळे यांच्या शेताजवळ वनविभागाने पिंजरा लावला. काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर बुधवारी बिबट्या रात्री उशीराने पिंजऱ्यात अडकला.
दरम्यान, नागरिकांनी पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याची माहिती वनविभागाला देताच पथक घटनास्थळी दाखल झाले. जेरबंद बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. बिबट्याला सुरक्षितरित्या ताब्यात घेण्यात आले. बिबट्याच्या पुढील तपासणीसाठी त्याला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले.