बिबटय़ा दर्शनाने नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी

एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

संग्रहित छायाचित्र

वन विभागाचे आवाहन

बिबटय़ाचा मुक्त संचार होत असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी. घरालगतच्या मोकळ्या जागेत मिरचीची धुरी करावी. या वासामुळे बिबटय़ा त्या परिसरात फिरकणार नाही. रात्री-अपरात्री बाहेर पडावे लागल्यास भ्रमणध्वनीवर मोठय़ा आवाजात गाणी लावावीत. आवाजाच्या दिशेने बिबटय़ा येत नाही.. हे आवाहन आहे वन विभागाचे. मखमलाबाद परिसरात बिबटय़ा दर्शनाची चर्चा रंगत असतांना मंगळवारी एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनाक्रमाची दखल घेत या विभागास मेरीतील पिंजरा अखेर सायंकाळी मखमलाबाद परिसरात नेण्याची उपरती झाली.

मागील आठवडय़ात मेरी परिसरातील नागरी वसाहतीत बिबटय़ाचा वावर असल्याचे लक्षात येताच तारवालानगर, मेरी यासह आसपासच्या परिसरात या विभागाच्या पथकाने दोन ते तीन वेळा शोध मोहीम राबविली. प्रत्यक्षात तेथे बिबटय़ाचा वावर असल्याचे वन विभागाने नाकारले नाही तसेच त्याला दुजोराही दिला नाही. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरात पिंजरा लावण्यात आला.

या घडामोडी ताज्या असतानाच मखमलाबाद शिवारात बिबटय़ा दृष्टीस पडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुळात हा बहुतांश परिसर शेतीचा असल्याने नागरी वस्ती प्रमाणे या ठिकाणी धोक्याची तीव्रता काही अंशी कमी आहे. येथील भौगोलिक रचना लक्षात घेतली तर दाट झाडी, शेती आवार, पाट-नाले यामुळे बिबटय़ाचा मुक्काम राहिला तरी तो त्रासदायक ठरणार नसल्याचे या विभागाचे गृहितक आहे. या ठिकाणी तो अधिक काळ मुक्काम करणार नाही. पाणी पिण्यासाठी तो कालवा व नदी किनारी येऊन काठाने इतरत्र निघून जाईल, असा अंदाज वन विभागाचे अधिकारी प्रशांत खैरनार यांनी व्यक्त केला.मखमलाबाद परिसरात तीन दिवसांपासून बिबटय़ा दिसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करीत आहे. मंगळवारी एकाच वेळी दोन बिबटे दिसल्याची माहिती कर्णोपकर्णी पसरल्याने मळ्यात व नागरी वसाहतीपासून काही अंतरावर वास्तव्यास असणाऱ्यांमध्ये घबराट पसरली. आदल्या दिवशी बिबटय़ाचे दर्शन झाले होते. त्याची माहिती नागरिकांनी शाळांमध्ये दिली. शालेय विद्यार्थ्यांनी ये-जा करताना खबरदारी घ्यावी, असा प्रयत्न केला जात आहे. मंगळवारी अनेकांनी विद्यार्थ्यांना शाळेतही पाठविले नाही. मुक्त संचार करणाऱ्या बिबटय़ाला त्वरीत जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे. बिबटय़ाबाबत सातत्याने तक्रारी आल्यावर या विभागाला पिंजरा बसविण्याची उपरती झाली. यासाठी मखमलाबाद शिवार, गोदा काठालगतचा परिसर येथे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. कोणत्या भागात बिबटय़ाचा वावर अधिक राहील किंवा असेल याचा अभ्यास करत त्याच ठिकाणी सायंकाळपर्यंत पिंजरा लावला जाईल, असे असे खैरनार यांनी सांगितले.

बिबटय़ापासून बचाव करण्यासाठी..

बिबटय़ाचा वावर होत असला तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.यासाठी शेत परिसरात राहणाऱ्यांनी घराबाहेर मिरचीची धुरी करावी. या वासाने बिबटय़ा त्या ठिकाणी फिरकणार नाही. तसेच रात्री-अपरात्री वा पहाटे घराबाहेर पडावे लागले तर नागरिकांनी भ्रमणध्वनीवर मोठय़ा आवाजात गाणी लावावी. बिबटय़ा आवाजाच्या दिशेने कधीही येत नाही. नागरिकांनी अशी दक्षता घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Leopard issue forest department