नाशिक – नाशिकरोड परिसरातील वडनेर दुमाला भागात बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या बालकाचा रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मृत्यू झाला होता. तीन वर्षाच्या आयुषच्या मृत्युने सर्वांच्या मनाला चटका बसला. या घटने नंतर वनविभागावर आरोपांच्या फैरी होत असतांना दोन दिवसांपूर्वी वडनेर दुमालासह परिसरातील ग्रामस्थांनी वनविभाग कार्यालयावर बिबट्या जेरबंद करा, यासाठी मोर्चा काढला. बिबट्याला पकडा अन्यथा वन मंत्र्याच्या कार्यालयावर मोर्चा काढू, असा इशारा दिल्यानंतर अवघ्या २४ तासात या परिसरात एक बिबट्या शुक्रवारी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.
देवळाली कॅम्प भागात तोफखाना केंद्राच्या फायरिंग रेंजलगत नागरी वसाहतीचा मळे परिसर आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला आयुष भगत हा चिमुकला आपली आठ वर्षीय बहिण श्रेया हिच्या बरोबर घराबाहेर ओट्यावर खेळत होता. काही कामासाठी श्रेया घरात गेली असता बिबट्याने झडप घालत आयुषला ओढून नेले. कुटूंबातील सदस्य बाहेर आल्यानंतर आयुष दिसला नाही. तेव्हा परिसरात रक्त सांडल्याचे दिसले. वनविभाग तसेच श्वानपथकाच्या मदतीने त्याचा शोध घेतला असता आयुषचा मृतदेह हाती लागला. वास्तविक, या लष्करी हद्द लगत गाव व मळे भागात बिबट्याचा कायम मुक्त संचार असतो.
बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले जातात. मात्र तो जेरबंद होण्यासाठी खाद्य टाकले जात नाही. नैसर्गिक अधिवासाच्या नावाखाली त्जंगल परिसरात साेडले जाते. अशा स्थितीतील बिबट्याचा वावर मानवी वस्तीसाठी धोकादायक ठरत आहे. आयुषच्या मृत्युनंतर वनविभागाच्या वतीने बिबट्या जेरबंद होण्यासाठी दुमाला भागात आधीचे दोन आणि घटनेनंतर दोन पिंजरे लावण्यात आले. बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी तीन ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले. इतके सारे होऊनही बिबट्या वनविभागाला दोन आठवड्यापासून गुंगारा देत होता. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाराज ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत आपला रोष व्यक्त केला. बिबट्याला जेरबंद करा अन्यथा वनमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा, कार्यालयात बिबट्या सोडू असा इशारा देण्यात आला होता.
दरम्यान, शुक्रवारी वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले. दुपारी कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्या कुठे लक्षात आल्यावर वनविभागाच्या वतीने सापळा रचत त्याला जेरबंद केले. बिबट्या जेरबंद झाला हे लक्षात येता वनविभागासह ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.
वडनेर दुमाला परिसरात कॅमेऱ्याच्या माध्यमातून बिबट्या कुठे आहे, हे लक्षात आले. त्यानुसार वनविभागाच्या वतीने तीन्ही बाजुने त्याला अडवत चौथ्या दिशेने तो धावत असतांना त्याला जेरबंद करण्यात आले. बिबट्या नर असून पुर्ण वाढीचा आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. – प्रशांत खैरनार (वनअधिकारी).