नाशिक : राज्य शिक्षण मंडळातंर्गत नाशिक विभागाचा बारावीचा निकाल ९१.३१ टक्के लागला. विभागात नाशिक जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९५.६१ टक्के तर, धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ७४.८८ टक्के लागला. मागील वर्षाच्या तुलनेत विभागाचा निकाल ३.४० टक्क्यांनी घसरला आहे. विभागात पुन्हा एकदा मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहीर झाल्यानंतर भ्रमणध्वनी, लॅपटॉप, संगणक विविध माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांचे निकाल जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातील नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत घेण्यात आली. सोमवारी या परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार ऑनलाईन पध्दतीने जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश असून परीक्षेसाठी नाशिक विभागातून एक लाख ५८,५९३ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी एक लाख ५७,८४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक लाख ४४,१३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. टक्केवारीनुसार विभागाचा निकाल ९१.३१ टक्के लागला. विभागात नाशिक जिल्हा सर्वाधिक म्हणजे ९५.६१, जळगाव ९४.५४ , नंदुरबार ८६.६२ आणि धुळ्याचा ७४.८८ टक्के निकाल लागला. परीक्षा काळात नाशिक विभागात १२ गैरमार्गाची प्रकरणे घडली. मंडळ शिक्षा सूचीनुसार दंड करण्यात आला आहे.
दरम्यान, ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यास कोणत्याही विशिष्ट विषयात गुणांची गुणपडताळणी करण्यासाठी मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या संकेतस्थळावर सहा ते २० मे या कालावधीत अर्ज करता येणार आहे. दुसरीकडे, बारावी निकाल जाहीर झाल्यानंतर खासगी शिकवणी वर्ग, महाविद्यालयांचे कट्टे, घरात निकालाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. पालकांनी मिठाई खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसून आले.
राज्यात नाशिक विभाग सातव्यास्थानी
कोकण राज्यात पहिल्या क्रमांकावर असून लातूर शेवटच्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे. राज्यात नाशिकचे स्थान सातवे आहे. नाशिक विभागात विज्ञान शाखेचा निकाल ९७.६२ टक्के, वाणिज्य ९४.५३, आयटीआय ८४.६७, कला शाखा ७९.९८, व्यवसाय अभ्यासक्रम ८०.६० टक्के लागला. दुसरीकडे, नाशिक विभागात मुलींनी बाजी मारली असून ९३.५१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांचे प्रमाण ८९.४४ टक्के आहे.