धुळे : नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थीं आजपासून दलात एक कर्तव्यदक्ष, निर्भय आणि धैर्यशील पोलीस म्हणून समाविष्ठ होत आहेत. तुम्ही समाजाचे खरे पहारेकरी असल्याने कोणत्याही प्रकारचे पक्षपाती वर्तन न करता आपली सर्वस्तरातील नागरिकांशी वागणूक न्यायपूर्ण आणि सहकार्याची ठेवावी, असा सल्ला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिला.

धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात ६४५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभ झाला. यावेळी जिल्हा अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय पवार, राज्य राखीव पोलीस दल गटाचे समादेशक प्रभाकर शिंदे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपप्राचार्य राहुल फुला आदी उपस्थित होते.

विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी, दीक्षांत समारंभ केवळ एका प्रशिक्षणाचा समाप्ती बिंदू नाही, तर एका उज्ज्वल आणि स्फूर्तीदायक प्रवासाची सुरुवात आहे, असे सांगितले. तुम्ही कठोर परिश्रम, अपार मेहनत आणि अद्वितीय शिस्तीच्या बळावर येथे उभे आहात. प्रशिक्षणादरम्यान आपणास चांगल्या प्रकारचे आंतरवर्ग व बाह्यवर्गाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणारी यंत्रणाच नाही, तर समाजाच्या सुरक्षेचे व अभेद्यतेचे सशक्त आधारस्तंभ आहे. तुमचे कार्य केवळ गुन्हेगारीला आळा घालणे नाही, तर समाजात सुव्यवस्था प्रस्थापित करणे आणि नागरिकांच्या सुरक्षेची भक्कम ताकद बनणे हे आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील विविध समूदायातील प्रभावशाली व सर्वसामान्य नागरिक, व्यापारी संघटना, शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी आपला नियमित संपर्क असणे आवश्यक आहे. एखाद्या वेळी तणावाचे प्रसंग निर्माण झाल्यास तणाव निवळण्यासाठी अशा व्यक्तींची आपणास मदत होत असते, असे त्यांनी नमूद केले.

पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य पवार यांनी, आजपावेतो नवप्रविष्ठ पोलीस शिपाई यांचे १२ प्रशिक्षण सत्र पूर्ण होत असून त्यात चार हजार ३८५ नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी यांनी आणि तीन सत्रांमध्ये एक हजार ३५ गृहरक्षकांनी मूलभूत प्रशिक्षण घेतले असल्याचे सांगितले. आजपावेतो एकूण १० हजार १५८ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजेत्यांचा सत्कार

यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण सत्र १२ मधील विजेत्या प्रशिक्षणार्थींचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. यात बेस्ट टर्न आऊट ऋषिकेश मठकर (सिंधुदुर्ग), आंतरवर्ग प्रथम सूर्यभान पाटील (जळगांव), बाह्यवर्ग प्रथम दिग्विजय दाभाडे (जळगांव), गोळीबार प्रथम शरद कोंड (नाशिक ग्रामीण), कमांडो प्रथम दिग्विजय दाभाडे (जळगांव), बेस्ट ड्रील-पद व शस्त्र- जितेंद्र मोरे (मिरा भाईदर), सर्वोत्कृष्ट खेळाडू -अमर क्षिरसागर (सोलापूर ग्रामीण) तर सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सूर्यभान पाटील (जळगांव) या सर्वांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.