जळगाव – जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत अतिवृष्टीसह पुराच्या पाण्यामुळे शेती खरडून गेल्याने सुमारे ५७ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. ज्यामुळे तब्बल ३२४ गावांतील ८० हजारांहून अधिक शेतकरी बाधित झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाने गेल्या आठवड्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल नुकताच नाशिक विभागीय आयुक्तांकडे सादर केला. त्यानुसार, ७७ गावांतील १४ हजारांहून अधिक शेतकरी बाधित होऊन ११ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानीची नोंद घेण्यात आली होती. त्यानंतर, रविवारी रात्री आणि सोमवारी सकाळी तसेच मंगळवारी पुन्हा पाचोरा, भडगाव, पारोळा, एरंडोल, पारोळा, जामनेर, जळगाव, भुसावळ आणि मुक्ताईनगर तालुक्यांना जोरदार पावसाने तडाखा दिला.

लहान-मोठ्या नद्या तसेच नाल्यांना मोठे पूर आल्याने पाचोरा शहरासह बरीच गावे जलमय झाली. शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कपाशी, मका, ज्वारी, सोयाबीन, कांदा, केळी, भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले.

कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यानंतर गेल्या तीन दिवसांतील नैसर्गिक आपत्तीने ३२४ गावांतील सुमारे ८० हजार ९७ शेतकरी बाधित होऊन सुमारे ५७ हजार २७९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पैकी कपाशी लागवडीखालील क्षेत्राचे सर्वाधिक ४४ हजार ६२२ हेक्टरचे नुकसान झाले आहे.

याशिवाय, १४ हजार ३६९ हेक्टरवरील मका, २८३० हेक्टरवरील सोयाबीन, १३३२ हेक्टरवरील बाजरी, ५०६ हेक्टरवरील कांदा, ४४० हेक्टरवरील तूर, ३५४ हेक्टरवरील फळपिके, ३०६ हेक्टरवरील इतर पिके, ८२ हेक्टरवरील केळी आणि ३६ हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे भडगाव तालुक्यात २२ हजार ४९३ हेक्टर, पाचोरा तालुक्यात १९ हजार १८३ हेक्टर, एरंडोल तालुक्यात १५ हजार ४९१, पारोळा तालुक्यात ५१५१ हेक्टर, मुक्ताईनगर तालुक्यात २४३७ हेक्टर, जळगाव तालुक्यात ८९ हेक्टर, जामनेर तालुक्यात २७ हेक्टर आणि भुसावळ तालुक्यात ३.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ऑगस्टच्या नुकसानीचे १० कोटी मंजूर

राज्यात जुलै ते ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीसह पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने अनुदानास मान्यता दिली आहे. जळगाव जिल्ह्यातही ऑगस्ट महिन्यात आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान होऊन १७ हजार ३३२ शेतकरी बाधित झाले होते. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नऊ कोटी ८६ लाख रूपयांची आर्थिक मदत मिळेल, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.