नाशिक : पंचवटीतील फुलेनगर भागात अलिकडेच सराईतांच्या टोळीने मागील भांडणाची कुरापत काढून दगडफेक आणि हवेत गोळीबार केला होता. गुन्हे शोध पथकाने या प्रकरणात चार दिवसांच्या अथक प्रयत्नांनी मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आहे.

शहर परिसरातील वाढती गुन्हेगारी हा नाशिककरांसह पोलीस प्रशासनासमोरील आव्हानात्मक विषय ठरु पाहत आहे. पोलीस वेगवेगळ्या कारवाईतून गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करीत असले तरी समाजकंटकांकडून सातत्याने पोलिसांना आव्हान देण्यात येत आहे. बुधवारी पंचवटीतील फुलेनगरात सराईत गुन्हेगारांच्या टोळक्याने जुन्या भांडणाची कुरापत काढत दगडफेक आणि गोळीबार केला. सुमित महाले (२१, रा. फुले नगर) यांनी याविषयी तक्रार दिली. संशयित विकी वाघ, ऋषिबाबा परसे, जय संतोष खरात, जय मोरे ऊर्फ टिंगरी, तुंड्या दादू आणि इतर चार ते पाच जणांचे टोळके बुधवारी मध्यरात्री विजय नगरात जमले होते.

शेषराव महाराज चौकातील सैलानी बाबा नगरच्या कमानीपासून सर्व हल्लेखोर आरडाओरडा करीत महाले यांच्या घराबाहेर जमा झाले. आरडाओरडीमुळे महाले घराबाहेर आले असता मागील भांडणाचा वाद उकरून काढत संशयितांनी महाले कुटुंबियांना शिवीगाळ केली. या प्रकाराला महाले यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. बंदुकीतून हवेत गोळीबार करून संशयित पसार झाले.

पंचवटी पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल करण्यात आल्यावर १० ते १२ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयितांच्या शोधासाठी पथके तयार करुन काहींना ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित संतोष खरात हा फुलेनगर परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. संतोष खरात हा अभिलेखावरील हद्दपार गुन्हेगार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंचवटी परिसर गुन्हेगारी कारवायांमुळे कायमच संवेदनशील राहिला आहे. या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती, काही शासकीय कार्यालये आहेत. पंचवटीतील वेगवेगळ्या भागात अवैध धंदे, दारू अड्डेचालकांची दहशत आहे. या ठिकाणी टोळी युध्दाचा भडका ही उडतो. त्यामुळे त्यांच्याविरोधात सहसा कोणी तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. समाज कंटकांच्या दहशती मुळे परिसरात गुन्हेगारीचा आलेख वाढतच आहे. समाजकंटकाडून सातत्याने नागरिकांना दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न होताे. लुटमार, हत्या, जबरी चोरी, वाहनांची तोडफोड प्रकार सातत्याने होत असल्याने पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे.