मालेगाव : केंद्र शासनाच्या निधीतून शहरात सुरु झालेल्या विविध कामांच्या भूमीपूजनासाठी न बोलावल्याच्या कारणावरुन खासदार डॉ. शोभा बच्छाव या महापालिका अधिकाऱ्यांवर चांगल्याच संतापल्या. विविध कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार बच्छाव यांनी महापालिकेत बैठक बोलावली होती. वर्षभराच्या काळात कामांचे भूमीपूजन करताना एखादे नारळ फोडण्यासाठी खासदार म्हणून मला बोलावले का, असा संताप बच्छाव यांनी व्यक्त केला.

महापालिका आयुक्त रवींद्र जाधव,अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे, उपायुक्त पल्लवी शिरसाठ, हेमलता डगळे, सुनिता कुमावत, शहर अभियंता कैलास बच्छाव, सहायक आयुक्त अनिल पारखे, विद्युत अधीक्षक अभिजीत पवार यांच्यासह काँग्रेसचे महानगरप्रमुख शरद आहेर, शिवसेनेचे (उध्दव ठाकरे) जितेंद्र देसले आदी बैठकीस उपस्थित होते. नियोजित कर्करोग रुग्णालयास जागा उपलब्ध करुन देणे, स्वच्छ भारत मिशन, अमृत-दोन योजनेची अंमलबजावणी, खासदार निधीतून अभ्यासिकेला जागा उपलब्ध करुन देणे, पंतप्रधान आवास तसेच दलित आणि अल्पसंख्यांक निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

केंद्र शासनाच्या निधीतून होणाऱ्या कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन करणे, हा स्वतंत्र विषय बैठकीच्या विषय पत्रिकेत नमूद होता. या विषयावर चर्चा सुरु झाल्यावर खासदार बच्छाव आणि त्यांचे पती डॉ. दिनेश बच्छाव यांचा संताप उफाळून आला. वर्षभराच्या काळात महापालिकेच्या वतीने सुरु झालेल्या एकाही कामाचे भूमीपूजन वा उद्घाटन कार्यक्रमाला बोलावले नाही, याची सल त्यांनी बोलून दाखवली. याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना जाब देखील विचारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकास कामांसाठी निधी मंजूर करताना खूप पाठपुरावा करावा लागतो. त्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री, सचिव यांना वारंवार भेटावे लागते. त्यानुसार मालेगाव शहरात विविध कामांसाठी केंद्र सरकारकडून आपण निधी मंजूर केला असल्याचे बच्छाव यांनी नमूद केले. तसेच या कामांच्या भूमीपूजनाप्रसंगी खासदार म्हणून आपल्याला बोलावणे आवश्यक होते, परंतु जाणून बुजून टाळले गेले, असा रोष यांनी व्यक्त केला. एक मे रोजी धुळे येथे पार पडलेल्या एका भूमीपूजन कार्यक्रमाला बोलावले नाही म्हणून आपण हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता, याकडे लक्ष वेधत मालेगाव महापालिकेच्या विरोधात असा हक्कभंग प्रस्ताव दाखल करावा लागेल का,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अखेरीस पालिका आयुक्तांनी सारवासारव करुन भविष्यात असा प्रकार घडणार नाही, अशी हमी बैठकीत दिली. त्यानंतर बैठकीत निर्माण झालेले तणावाचे वातावरण निवळले.