मालेगाव : शहरातील पवारवाडी पोलिसांनी वाहन चोरांच्या टोळीला जेरबंद केले असून ३० दुचाकी आणि एक ट्रॅक्टर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. टोळी ताब्यात आल्याने नाशिक तसेच शेजारच्या जिल्ह्यांमध्ये घडलेल्या वाहन चोरीच्या आणखी काही घटनांचा तपास लागण्याची शक्यता आहे.
संवदगाव फाट्याजवळ पोलिसांनी सापळा रचला असता टोळी हाती लागली. प्रारंभी शहेजाद इकबाल (सलामताबाद, मालेगाव), शेख युसूफ (गुलशेरनगर, मालेगाव) या दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दुचाकी चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली. तसेच त्यांच्या अन्य तीन साथीदारांची नावे उघड केली. त्यानुसार पोलिसांनी शेख नजीम अब्दुल हमीद (रौनकाबाद), प्रल्हाद वाघ आणि देविदास वाघ (संवदगाव, मालेगाव) या तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीत या पाच जणांच्या टोळीने पवारवाडी, छावणी, किल्ला, मालेगाव कॅम्प, नांदगाव, निफाड, पिंपळगाव, कळवण, चांदवड, नाशिक शहर,पंचवटी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकींची चोरी केल्याचे उघड झाले. याशिवाय जळगाव जिल्ह्यातील धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ट्रॅक्टरची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत केलेल्या तपासात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या आणि या टोळीने केलेल्या एकूण १४ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले.
दोन आठवड्यांपूर्वी कॅम्प पोलिसांनी दोन चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून चोरी झालेल्या २३ दुचाकी जप्त केल्या होत्या. पाठोपाठ पवारवाडी पोलिसांनी चोरीस गेलेल्या ३० दुचाकी ताब्यात घेत आणखी एक मोठी कारवाई केली. जिल्हा पोलीस प्रमुख बाळासाहेब पाटील, अपर अधीक्षक तेगबिरसिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राहुल खताळ, सहायक निरीक्षक किरण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
ग्रामीण भागातही वाहन चोरीत वाढ
ही टोळी जेरबंद झाल्यामुळे वाहन चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत. आतापर्यंत या घटना शक्यतो शहर परिसरात घडत होत्या. मात्र आता ग्रामीण भागातही दुचाकी चोरीचे लोण पसरल्याचे दिसत आहे. परिणामी, वाहनधारक वैतागले आहेत.