मालेगाव : तालुक्यातील पाडळदे येथे समाधान बळीराम माळी या १४ वर्षीय शाळकरी मुलाला विहिरीत फेकून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे पाडळदे परिसरात खळबळ उडाली आहे.

सोमनाथ झिंजर (३५) असे संशयिताचे नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास संशयित सोमनाथ याने समाधानला आपल्या सोबत दुचाकीवर बसवून शेतात नेले होते. शेतात बांधलेल्या बैलांची जागा बदल करून लगेच परत येऊ, असे त्याने समाधानला सोबत नेतांना सांगितले होते. परंतु मध्यरात्र झाल्यावरही समाधान घरी न परतल्याने समाधानची आई कल्पना यांनी शोधाशोध सुरू केली. त्याला दुचाकीवर शेतात नेणाऱ्या सोमनाथशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता तो घरात झोपला असल्याचे आढळून आले. त्यानंतर समाधानच्या नातेवाईकांनी सोमनाथला बरोबर घेऊन त्याच्या शेतात शोधकार्य सुरू केले. तेव्हा शनिवारी सकाळी शेतातील विहिरीत त्याची चप्पल पाण्यात तरंगताना दृष्टीस पडली. त्यामुळे गावकऱ्यांचा संशय बळावल्याने काही धाडसी तरुणांनी विहिरीत उड्या घेतल्या. तेव्हा पाण्यात मृतदेह आढळून आला.

गावकऱ्यांनी हा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. दरम्यान, तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. संशयिताने समाधानला आधी मारहाण केली आणि नंतर विहिरीत टाकून त्याची हत्या केली, असा आरोप समाधानच्या नातेवाईकांनी केला. कल्पना माळी यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून सोमनाथला ताब्यात घेतले आहे. मयत समाधान हा आठव्या इयत्तेत शिक्षण घेत होता.

हा प्रकार समजल्यावर संतप्त गावकरी आणि नातेवाईकांनी तालुका पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना घेराव घातला. आरोपीवर कडक कारवाई करावी, त्याला फाशी द्यावी, असा आग्रह त्यांनी धरला. सोमनाथ याने समाधान याची हत्या का केली, याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर हे अधिक तपास करीत आहेत.